MD Drugs Case : एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या file photo
छत्रपती संभाजीनगर

MD Drugs Case : एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

एक मेकॅनिक तर दुसरा मटण दुकानातील कामगार; १३ ग्रॅम एमडी जप्त

पुढारी वृत्तसेवा

Two arrested for selling MD drugs

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका नामांकित महाविद्यालयाच्या हाकेच्या अंतरावर एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांच्या एनडीपीएस पथकाने मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी (दि. २५) रात्री उशिरा टाऊन सेंटर, द्वारकादास शामकुमार दुकानासमोरच्या भागात करण्यात आली.

मेकॅनिक शेख सादीक शेख सलीम (२७, रा. बक्कलगुडा, शहागंज) आणि मटण दुकानातील कामगार अमान कुरेशी मुश्ताक कुरेशी ऊर्फ चौधरी (२५, रा. जिन्सी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांकडून १३ ग्रॅम ५९० मिलीग्रॅम एमडी, दोन महागडे मोबाईल, एक दुचाकी जप्त केल्याची माहिती सहायक निरीक्षक सचिन जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएसच्या पथकाला दोन तस्कर एमडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सापळा रचला. एका नामांकित महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, टाऊन सेंटर येथील द्वारकादास शामकुमार दुकानासमोरील भागात हे दोघे एका दुचाकीवर संशयास्पद स्थितीत उभे होते. पोलिसांच्या पथकाने त्यांना अचानक गराडा घालून त्यांची झडती घेतली.

यावेळी सादीकच्या खिशात १० ग्रॅम ९३० मिलीग्रॅम वजनाच्या 'एमडी'च्या १८ छोट्या पुड्या सापडल्या. तर, अमानच्या खिशातून २ ग्रॅम ६६० मिलीग्रॅम वजनाच्या ५ पुड्या आढळून आल्या. आरोपी अमानकडे 'आयफोन १२' आणि आरोपी सादीककडून 'आयफोन १३ प्रो मॅक्स' असे महागडे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकीही जप्त केली.

याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक उद्देश्वर मुंडे, अंमलदार नारायण पायघन, भावसिंग चव्हाण, सतीश जाधव, छाया लांडगे, उज्ज्वला सलामपुरे, देशराज मोरे, सरताज पठाण, विशाल मेटे, विठ्ठल पवार यांनी केली.

महाविद्यालयीन विद्यार्थी टार्गेट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सादीक हा मुख्य पुरवठादार असून, अमान हा त्याच्याकडून 'एमडी' घेऊन ग्राहकांना विशेषतः महाविद्यालयीन तरुणांना विकण्याचे काम करत होता. हे तस्कर अर्धा ग्रॅम 'एमडी' पावडरच्या छोट्या पुड्या तयार करून ग्राहकांकडून तब्बल तीन हजार रुपये उकळत होते. यात शहरातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांचे ग्राहक असल्याचे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT