Turnover of over Rs 700 crore in four days of the festive season at Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीचा दसऱ्याला फटका बसल्यानंतर सावरलेल्या बाजारपेठाला दिवाळी पाडवा आणि भाऊबीज चांगलीच पावली. या शुभमुहूर्तावर बांधकाम क्षेत्र, वाहन बाजार, सराफा मार्केट, कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्ससह एकूण बाजारपेठेने नवी उभारी घेतल्याने सणासुदीच्या या चार दिवसांत सुमारे सातशे कोटींची उलाढाल झाल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी सांगितले.
साडेतीन मुहूतपैिकी एक संपूर्ण मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्यानिमित्त बाजार पेठांमध्ये मोठी उलाढाल होत असते. खासकरून बांधकाम क्षेत्र आणि वाहन बाजारात या एका दिवसातच सर्वाधिक व्यवसाय होतो. त्यामुळे यंदाही दिवाळी- पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन गृहप्रवेश आणि किती वाहने रस्त्यावर उतरणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. शहरातील वाहन क्षेत्र तज्ज्ञ विकास वाळवेकर यांनी सांगितले, दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सहाशे चारचाकी, तर दोन हजार दुचाकी वाहने रस्त्यावर उतरली. त्यामुळे वाहन बाजार सुसाट राहिले. जीएसटी दर कपातीमुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर दुचाकी-चारचाकी वाहनांची भरघोष विक्री झाली होती. यासह कपडा मार्केट, किराणा, जनरल मार्केटला नवी झळाळी प्राप्त झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ३५ कोटींची उलाढाल
दिवाळी-पाडव्याचा मुहूर्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेसाठीही चांगला ठरला. या शुभमुहूर्तावर गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे सर्वसामान्य ग्राहकांचा अधिक कल दिसून आला. स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज यासह मिक्सर, आर्यन, वॉटर क्युरीफायर, ओव्हन या गृहोपयोगी वस्तूंना अधिक मागणी होती. त्यामुळे या चार दिवसांत इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सराफा बाजाराला २५ कोटींची झळाळी
सोने-चांदीच्या वाढत्या दरामुळे दिवाळी पाडव्याला सराफा बाजारात तुरळक गर्दीचे चित्र होते. तत्पूर्वी धनतेसरच्या शुभमुहूर्तावर सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. या दोन्ही मुहूर्तावर सराफा बाजारात सुमारे २३ ते २५ कोटींची उलाढाल झाल्याचे जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले. सोन्याचे दर प्रतितोळा १ लाख २७ हजार ७०० तर, चांदी १ लाख ५९ हजार रुपये किलोप्रमाणे असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
अडीचशे बुकिंग, तीनशे गृहप्रवेश
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर तीनशे कुटुंबांनी आपल्या हक्काच्या घरात प्रवेश केला. या शुभमुहूर्तावर घर मिळावे, यासाठी इच्छुकांनी आधीच या घरांची बुकिंग केलेली होती. सणासुदीत आणखी अडीचशे बुकिंग झाले असून, बांधकाम क्षेत्रासाठी दिवाळी पाडवा तेजोमय राहिल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पटारे यांनी सांगितले.