

The wait for electric AC city buses will be over
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई, पुणे आणि नाशिकप्रमाणे शहरातही येत्या डिसेंबरपासून वातानुकूलित सिटी बस धावणार आहे. ओलक्ट्रा कंपनीसोबत स्मार्टसिटीने केलेल्या करारानुसार येत्या दीड महिन्यात शहराला नव्या ३५ एसी इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यासाठी जाधववाडी मोंढा येथील सिटी बस डेपोमध्ये चार्जिंग स्टेशनचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मदतीने शहरवासीयांसाठी सिटीबस सेवा सुरू केली आहे. या प्रकल्पातून शहरासाठी शंभर स्मार्ट सिटीबस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बससाठी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या जागेत भव्य बसडेपो उभारण्यात आला आहे. या डेपोमध्येच नव्या ई-स्मार्ट बससाठी स्वातंत्र डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासाठी नुकतेच सबस्टेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक अस-लेला वीज पुरवठा आता उपलब्ध झाला आहे. येत्या महिन्याभरात या डेपोमध्ये ई-बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण केले जाणार आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात स्मार्ट सिटीला ओलक्ट्रा कंपनीकडून १० ई बस मिळणार आहेत. त्यानंतर टप्प्या टप्याने उर्वरीत २४ बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
चार महिन्यांपूर्वीच एक ईबस कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. त्या बसची ट्रायल सध्या शहरात सुरू असून या बसचे चार्जिंग एसटी महामंडळाच्या स्थानकात केले जात आहे.