Truck breaks down in Ajanta Ghat; queues of vehicles stretch for 1 km
अजिंठा, पुढारी वृत्तसेवा : अजिंठा घाटात रविवारी (दि.१) सकाळी सुमारे अकरा वाजेच्या सुमारास एका ट्रकचा बिघाड झाल्याने घाटातील वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रहदारी कधी ठप्प तर कधी संथ गतीने सुरू होती. अरुंद रस्ते आणि वाढलेल्या नालीची रुंदी यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र झाली आहे.
घाटात ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक कोंडी इतकी वाढली होती की घाटाच्या वर व खाली सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारी सुटीचा दिवस असल्याने अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने घाटात दाखल झाले होते. मात्र या कोंडीमुळे पर्यटकांना दीर्घकाळ वाहनांतच अडकून राहावे लागले, त्यामुळे त्यांचा मोठा मनस्ताप झाला.
घाटातील ठप्प झालेली वाहतुकीबाबत माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, हेड कॉन्स्टेबल संतोष पाईकराव, कृष्णा ढाकरे, राम आडे व बबन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी स्वीकारली. पोलिसांनी एकतर्फी वाहतूक थांबवून दुसऱ्या बाजूची वाहतूक सुरू ठेवत योग्य नियोजन केले. त्यामुळे घाटातील रहदारी पूर्णपणे ठप्प होऊ दिली नाही.
दरम्यान, काही बेशिस्त वाहनचालकांमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी संयम राखत घाट चढणाऱ्या व उतरणाऱ्या वाहनांना योग्य दिशेने मार्गदर्शन करून वाहतूक सुरळीत ठेवली. तथापि, निकामी ट्रक सायंकाळपर्यंत दुरुस्त न झाल्यास रात्रीही घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागणार आहे.
घाटातील नाल्या ठरतात डोकेदुखी
अजिंठा घाटातील अरुंद रस्ते व अवघड वळणांवर रस्त्याच्या कडेला असलेल्या चार ते पाच फुट रुंदीच्या नालीमुळे रस्त्याची वापरण्यायोग्य रुंदी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी नाली दोन ते अडीच फुट रुंदीची असताना वाहतूक तुलनेने सुरळीत होती. सध्या मात्र वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, रस्ते रुंदीकरण तसेच नालीची रुंदी कमी करण्याची मागणी जोर धरत आहे.