Accident News : अजिंठा घाटात ब्रेक फेल ट्रक; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : अजिंठा घाटात ब्रेक फेल ट्रक; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

दरीत कोसळण्यापूर्वी ट्रक सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला थांबविला

पुढारी वृत्तसेवा

Truck brake failure at Ajantha Ghat; A major disaster was averted by the driver's intervention

फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटातील घोडी पटांगण परिसरात शनिवारी (दि. २५) ब्रेक निकामी झालेल्या मालवाहू ट्रकवर चालकाने प्रसंगावधान राखत नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

जालना येथून लोखंडी आसारी घेऊन सुरतकडे निघालेला ट्रक (क्र. जीजे १८ बीवाय १०५४) अजिंठा घाटातील अवघड वळणावर आला असता अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. वाहन नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चालक सनी मानसिंग याने धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत ट्रक रस्त्याच्या कडेला मातीच्या भरावाकडे वळवून सुरक्षित थांबवला.

त्यामुळे ट्रक दरीत कोसळण्याचा धोका टळला. घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल आकाश गवळी, गृहरक्षक दलाचे जवान बागुलकर, रोकडे तसेच पोलिस मित्र स्वप्नील चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

अजिंठा घाटातील नागमोडी वळणे आणि सततची वाहतूक लक्षात घेता हा परिसर अपघातप्रवण मानला जातो. अशा परिस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर मोटे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, अंमलदार जगदीश सोनवणे, नीलेश लोखंडे, आकाश गवळी, संतोष उबाळे, कृष्णा इंगळे, फिरोज तडवी तसेच गृहरक्षक दलाचे जवान सातत्याने गस्त घालून वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT