

Attempted to grab land through fake purchase deeds
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सावंगी येथील १७ गुंठे जमीन हडपण्यासाठी बनावट खरेदीखते, सातबारा आणि मागील तारखांचे खोटे नोटरी करारनामे तयार करून एका वकिलाची ५० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात तब्बल १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. सुशील बियाणी (रा. उस्मानपुरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २०१२ मध्ये त्यांनी ही जमीन खरेदी केली होती. मात्र, १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम सुरू असल्याचे त्यांना दिसले. जाब विचारला असता, आरोपींनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे मालकी हक्क सांगत बियाणी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एजाज अहमद खान याच्या नावावर कोणतीही जमीन नसताना त्याच्या नावे बोगस दस्तऐवज बनवून 'करेक्शन डीड' द्वारे जमिनीच्या मूळ चतुःसीमा बदलण्यात आल्याचे समोर आले आहे.
१८ जणांवर गुन्हा
या प्रकरणात सय्यद इर्शाद अली जैदी,सरफराज जैदी, जिशान सरफराज अली जैदी, नौशाद अली जैदी, दिलशाद अली जैदी, शहादाब अली जैदी, सय्यद जव्वाद अली जैदी, मोहम्मद मस्सी, शेख मजीद शेख इमाम, एजाज अहमद खान जब्बार अहमद खान यांच्यासह एकूण १८ जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करीत आहेत.