Travel operators likely to hike ticket prices by 20 percent
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
दिवाळीची धामधूम सुरू होताच शुक्रवार (दि. १७) पासून २० किंवा ३० टक्के हंगामी दरवाढ करण्याची शक्यता ट्रॅव्हल्सचालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, अव्वाच्या सव्वा तिकीट आकारणाऱ्यांवर आरटीओची नजर असून, त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
दरवर्षी एसटीची भाडेवाढ होताच ट्रॅव्हल्स चालकही भाडेवाढ करतात. यावर्षी एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. असे असले तरी एसटीच्या दरापेक्षा दीड पट भाडेवाढ करण्याची मुभा ट्रॅव्हल्सचालकांना असल्याने ते १७ ऑक्टोबरपासून २० ते ३० टक्के भाडेवाढ करण्याची शक्यता आहे. दरम्यान, जास्त दर आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांवर आरटीओच्या पथकांची नजर असून, प्रवाशांनी अडचण असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
अतिवृष्टीमुळे प्रवाशांकडून अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. यावर्षी २० ते ३० टक्के दरवाढ करण्याचे नियोजन असून, यावर अद्यापही बैठक झाली नाही. बैठकीत जो निर्णय होईल त्यानुसार हंगामी दरवाढ करण्यात येणार असल्याची माहिती ट्रॅव्हल्स संघटनेच्या वतीने देण्यात आली.
दिवाळीदरम्यान ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक तसेच सहायक निरीक्षकांचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. ते नियमित क्षमते-पेक्षा जास्त प्रवासी, कागदपत्रांची तपासणी, वाहनांचे फिटनेस तसेच प्रवाशांची सुरक्षा याची तपासणी करण्यात येणार आहे. या बरोबरच तिकिटाच्या दरांचीही माहिती घेण्यात येणार आहे.