Traffic jam at Ajanta Ghat for more than 20 hours
फर्दापूर, पुढारी वृत्तसेवा: छत्रपती संभाजीनगरड्डूजळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात रविवारी रात्री झालेल्या वाहनबिघाडांच्या मालिकेमुळे तब्बल २० तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली. अरुंद आणि वळणदार घाटरस्त्यावर तीन ठिकाणी ट्रक बिघाडल्याने घाटात रात्री ८.१५ वाजल्यापासून सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. त्यामुळे पर्यटक, प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्णांना कडाक्याच्या थंडीत संपूर्ण रात्र महामार्गावरच व्यतीत करावी लागली.
भुसावळकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने औष्णिक वीज केंद्राची राख घेऊन जाणारा ट्रेलर (क्र. एमएच २१ बीएच ५८६८) अजिंठा घाटातील अरुंद मार्गावर रविवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास अचानक बंद पडला. त्यामुळे घाटातील महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, वाहतूक कोंडीत अडलेल्या वाहनांची मार्ग काढण्याची धडपड सुरू असतानाच अजून दोन ट्रक घाटातील वळणदार मार्गावर बंद पडले.
त्यामुळे घाटात प्रचंड वाहतूक कोंडी होऊन फर्दापूर बसस्थानकापासून घाटापर्यंत तब्बल तीन किलोमीटरचा रस्ता वाहनांनी गच्च भरून गेला. परिणामी वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेक पर्यटक, प्रवासी व वाहनचालकांना संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत कुडकुडतच महामार्गावर व्यतीत करावी लागल्याचे दिसून आले. वाहतूक कोंडी होऊन तब्बल २० तासांहून अधिक काळ उलटला तरीही सोमवारी (दि. १७) दुपारी ४ वाजेपर्यंत घाटातील परिस्थिती कायम असल्याचे दिसून आले आहे. असलेली वाहतूक आणि अरुंद रस्त्यामुळे होत असलेल्या वाहन बिघाडांमुळे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत असून कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.