Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठवाड्यात कडकडीत बंद file photo
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठवाड्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षण उपोषणाला पाठिंबा; बस, रेल्वेसेवेवर परिणाम, शैक्षणिक संस्था, व्यापाऱ्यांचाही सहभाग

पुढारी वृत्तसेवा

Total shutdown in Marathwada in support of Jarange

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मराठवाड्यात गुरुवारी विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. बंद काळात कोणताही अनुत्चित प्रकार घडला नाही.

जरांगे यांनी शासनाला दोन दिवसांची मुदत दिल्यामुळे जालना जिल्हा बंदचा निर्णय स्थागित करण्यात आला होता, परंतु नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला, शहरातील नवीन मोंढा कडकडीत बंद होता. शहरातील चौका-चौकात बंदच्या पाश्र्वभूमीवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यात बंदला प्रतिसाद मिळाला. बसस्थानक व रेल्वेत नेहमीपेक्षा प्रवाशांची गर्दी कमी होती.

परभणीत शुकशुकाट

परभणी : परभणी जिल्हा बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बंदच काळात शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे एका युवकाने मोबाईल टावरवर चढून अनोखे आंदोलन करत मागण्या मान्य होईपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. गंगाखेडला चार युवकांनी जलकुंभावर चढून आंदोलन करत मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला. बंदमुळे जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने ५ वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी घटक चाचणी परीक्षा रद्द करण्यात आली असून सदील परीक्षा शनिवारी (दि.५) होणार आहे. परभणीत मुख्य बाजारपेठेतील रस्ते निर्मनुष्य दिसून येत होते.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत कडकडीत बंद:

वसमतला प्रतिकात्मक अंत्ययात्रा हिंगोली: वसमतमध्ये मराठा समाजाच्या वतीने राज्यातील 288 आमदारांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात आखाडा बाळापूर, डोंगरकडा, जवळा बाजार, गोरेगाव, सेनगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, वसमतला अंत्ययात्रा काढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोली व हट्टा येथे 4 सप्टेंबर रोजी बंदची हाक देण्यात आली आहे.

लातूरला मोटारसायकल रॅली

लातूर: लातूर शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्याने नेहमी गजबजणारे लातूर अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. सकाळी सकल मराठा समाजबांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले. प्रारंभी त्यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहरात मोटारसायकल रॅली काढून नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, आणि खासगी आस्थापनांनीही बंदला प्रतिसाद दिला. बंदमुळे बाजार समितीत सौदे निघू शकले नाहीत.

राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको धाराशिव : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या धाराशिव जिल्हा बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. ३) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मुख्य बाजारपेठेसह राजमाता जिजाऊ चौक, बसस्थानक परिसर आणि विविध भागांतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मनोज जरंगे यांनी अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

व्यापारी महासंघानेही बंदला पाठिंबा दिला. सकाळी कार्यकत्यांनी शहरातून फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. बंदमुळे शहरातील बहुतांश शाळाही बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास काही कार्यकत्यांनी बसस्थानकात जाऊन बससेवा काही काळ बंद पाडली. त्यानंतर बससेवा पूर्ववत झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेऊन आंदोलनावर तोडगा काढावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

आज नांदेड जिल्हा बंदची हाक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा दिवसापासून सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांनी गुरुवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली. आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी मान्य करण्याचे आवाहन केले. हदगाव, हिमायतनगर, नायगाव, कंधार, लोहा, मुदखेड तालुक्सातील बारडसह नांदेड शहरात वाडी बु. येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. राज कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विशाल रैली काढण्यात आली. दरम्यान शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हा बंदची हाक दिली आहे.

जरांगेंच्या उपोषणाला पाठिबा देण्यासाठी गेलेल्या मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत गेलेल्या एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ३) सकाळी उघडकीस आली. मयत दशरथ रायकर दशरथ रायकर असे या मृत मराठा आंदोलकाचे नाव आहे. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून ते बीड जिल्ह्यातील संगम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

या विषयी माहिती अशी की, दशरथ रायकर हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना पाठिबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. बुधवारी रात्री उशिरा रायकर अंतस्वाली येथील एका शेतात झोपले होते. गुरुवारी सकाळी झोपेतून उठत नसल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून रायकर यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे अंतरवाली सराटीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT