tore the case paper in a two doctors quarrel in Ghati Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रुग्णाला वॉर्डात पाठवायचे तर आमच्याकडे का पाठवले? याच कारणाने घाटीतील सीएमओ आणि अपघात विभागातील डॉक्टरांमध्ये शनिवारी (दि.१२) दुपारी जोरदार शाब्दिक भांडण लागले. रागाच्या भरात एकाने रुग्णाचा केसपेपरच फाडून टाकला. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले.
कन्नड तालुक्यातील एक ५६ वर्षीय महिला पोटदुखीच्या उपचारासाठी शनिवारी दुपारी घाटी सीएमओकडे आली. सोबत त्या महिलेचा मुलगाही होता. सीएमओ महिला डॉक्टरने या महिलेस सोनोग्राफी करण्याचे सांगत अपघात विभागात पाठवले. वेदनेने विव्हळत ही महिला मुलासह अपघात विभागात गेली.
तेथील इंटर्न डॉक्टरने त्यांना पुन्हा सीएमओकडे पाठवले. यावरून सीएमओ आणि इंटर्न डॉक्टरमध्ये जोरदार शाब्दिक वादावादी सुरू झाली. अपघात विभागातच भांडण जुंपल्याने चांगलाच गराडा जमला. रागाच्या भरात सीएमओने त्या महिला रुग्णाचा केसपेपर तिथेच टर्राटरा फाडून फेकला.
यामुळे आधीच वेदनेने विव्ह-ळणारी महिला माझा पेपर का फाडला अशी केविलवाणी विचारणा करत होती. आवाज कानावर पडताच धावून आलेल्या सुरक्षा रक्षकांनी दोन्ही डॉक्टरांचे भांडण सोडवले. यानंतर त्या महिला रुग्णास पुन्हा केस पेपरही सुरक्षा रक्षकांनीच काढून आणून दिला. नवीन केस पेपर घेऊन ही हतबल महिला मुलासह सोनोग्राफी करण्यासाठी पुढे गेली. दरम्यान, दोन्ही डॉक्टरांच्या भांडणामुळे या रुग्णाची नाहक फरपट झाल्याने बघणाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता.