Time to rely on tankers even to fill Jayakwadi Dam
पैठण, पुढारी वृत्तसेवा : ऑगस्ट महिना संपत आला असून पाऊस तब्बल एक महिन्यापासून पैठणकरांवर रुसला आहे. पैठण तालुक्यातील उन्हाळ्यासारखी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
या पावसाळ्यातही तालुक्यातील १४ गावे व विविध वाड्या-वस्त्यांमधील तब्बल ४६ हजार ८४२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना न राबविल्यामुळे सध्या २५ खासगी टँकरच्या माध्यमातून दररोज ४६ खेपा करून नागरिकांना पाणी पुरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
विशेष म्हणजे अनेक गावामध्ये टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी पंचायत समितीत लगबग सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले. यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पैठण तालुक्यातील आडूळ खुर्द (२,०००) अब्दुल्लापूर तांडा (१,२५०), खादगाव (३,९८६), दोरेखेडा-बंगला तांडा-बन्नी तांडा-नरसिंग तांडा (१,८७६) आणि केकत जळगाव (४,९००) येथील नागरिक पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत.
सर्वाधिक गंभीर परिस्थिती आडूळ खुर्द, आडूळ तांडा, खडकी तांडा, जमालवाडी तांडा आणि पिंपळवस्ती या भागात आहे. येथे १५ हजार लोकसंख्येसाठी तब्बल ७ टँकर सुरू असून, नागरिकांना दररोज पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना मजुरांना रोजगार सोडून पाण्यासाठी गावात राहण्याची वेळ आली.
याशिवाय ब्राह्मणगाव तांडा (९६८), लिंबगाव (३,०००), मुरमा (२,६००), धेरगाव (३,१७२), पारडी (२,३७०), सुलतानपूर (१,३००), वडजी (१,८२०) आणि सोलनापूर (२,६००) या गावांमध्येही टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. टंचाईग्रस्त भागासाठी सध्या केवळ एकच विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. टँकर भरण्यासाठी स्वतंत्र विहिरींची संख्या शून्य असल्याने उपलब्ध जलस्रोतांवर प्रचंड ताण पडत आहे. ग्रामीण भागातील ही टंचाई लक्षात घेऊन लवकरच नवीन विहिरी अधिग्रहित केल्या जातील अशी माहिती पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांनी दिली.
टंचाईग्रस्त गावांची पाहणी
अनेक गावात पाणीटंचाईमुळे टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव आले आहेत. टंचाईग्रस्त गावाची पाहणी करून स्थानिक जलस्रोत तपासून गरजेनुसार नवीन टँकर सुरू अथवा वाढवले जातील अशी प्रक्रिया पंचायत समिती स्तरावर सुरू असल्याची माहिती सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी दिले आहे.
विकतचे पाणी घेण्याची वेळ
प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात सुरू केलेले पाण्याची टँकर गावात येण्याचा वेळ निश्चित नसल्याने. अनेक नागरिकांनी दररोजच्या दुधाप्रमाणे पाण्याचा महिन्याचा उकाडा लावण्याची वेळ आली. या नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ ढिसाळ कारभारामुळे आली आहे.