Gangapur Bolegaon road Tiger Sighting
गंगापूर : गंगापूर शहरापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर, बोलेगाव रोडवर शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी आणि प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेगावकडे जाणारी एक कार नामकाच्या पाटाजवळील एकनाथ जाधव यांच्या शेताजवळील रस्त्यावरून जात असताना अचानक रस्त्यावर वाघ समोर आला. कार चालकाने तत्काळ शांतता राखत मोबाइलवर वाघाचे फोटो टिपले. काही क्षण रस्त्यावर उभा राहिल्यानंतर वाघ निवांतपणे दमानी चालत शेजारच्या शेतात निघून गेला.
गंगापूर तालुक्यात यापूर्वी बिबट्याचा वावर आढळत असला तरी, आता वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती अधिक वाढली आहे. रात्रीच्या वेळेस शेतात जाणे किंवा रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाकडे त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. “योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.