Three-year free permission from Municipal Corporation for new Ganesh Mandals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील नवीन गणेश मंडळांना दिलासा दिला असून यंदा नव्याने स्थापन होणाऱ्या गणेश मंडळांना सलग तीन वर्षांसाठी निःशुल्क परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे नवोदित मंडळांना उत्सव सुरळीत पार पाडण्यास मोठा हातभार मिळणार आहे.
महापालिकेकडून दरवर्षी गणेशोत्सवासाठी मंडळांना परवानगी देण्यात येते. मात्र अनेकदा मंडळांना शुल्क भरावे लागते, त्यातच इतर नियमांची अडचणही उभी राहते. त्यामुळे यंदा विशेष निर्णय घेत, नवीन मंडळांना तीन वर्षांपर्यंत शुल्कमुक्त परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
दरम्यान, पाच वर्षांची कायमस्वरूपी परवानगी घेत लेल्या जुन्या मंडळांनी परवानगीमध्ये नमूद केलेल्या स्थळ व स्टेज, मंडप क्षेत्र यामध्ये बदल करू नये. तसेच इतर अटी शर्तीचे पालन करावे. त्यांच्या ५ वर्षांच्या परवानगीचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी नव्याने परवानगी घ्यावी, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पारंपरिक वातावरणाला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन व मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे असून गणेश मंडळांनी नियमांचे पालन करणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.