Three tractors involved in illegal sand transportation were seized at Pishor
पिशोर, पुढारी वृत्तसेवा: अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी पिशोर पोलिस ठाण्याच्या वतीने ठिकठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी करण्यात आलेल्या या कारवाईत विनापरवाना बेकायदेशीररीत्या शासनाच्या मालकीची वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून, संबंधित चालक व मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. १७ रोजी रात्री ०३.१५ वाजता पळशी बु. शिवारातील भगवान गायकवाड यांच्या शेताजवळ पिशोर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सागर कारभारी जाधव व बापू देविदास नलावडे (दोन्ही रा. पळशी बु, ता. कन्नड) यांच्या ताब्यातील स्वराज कंपनीचा पांढऱ्या भगव्या रंगाचा ट्रॅक्टर (एम.एच. २० जी.व्ही. १७५४) पकडण्यात आला.
सुमारे ६ लाख रुपये किमतीच्या ट्रॅक्टरच्या १ लाख रुपये किमतीच्या ट्रॉलीमध्ये ६ हजार रुपये किमतीची अवैध वाळू विनापरवाना चोरट्या पद्धतीने विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार कौतिक सपकाळ यांच्या तक्रारीवरून पिशोर पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दि. ०७ रोजी दुपारी ०२.२० वाजता टाकळी शाहू ते आडगाव रस्त्यावर दुसरी कारवाई करण्यात आली. या ठिकाणी भारत सुदाम गोराडे (२२, रा. म्हसला, ता. सिल्लोड) याच्या ताब्यातील फॉर्मट्रेक कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (एम.एच. २० एच.बी. ४०३७) पकडण्यात आला. सुमारे ७,००,००० रुपये किमतीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ६,००० रुपये किमतीची अवैध वाळू विनापरवाना वाहतूक केली जात होती. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक भारत गोराडे व ट्रॅक्टर मालक सुदाम सर्जेरा गोराडे (रा. म्हसला बुगा, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार गणेश कवाल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई (दि.९) रात्री ०८.४५ वाजता करण्यात आली. पळशी बु. शिवारातील सोळंके वस्ती येथे छापा टाकला. या कारवाईत ६ लाख रुपये किमतीचा व त्यास जोडलेली १ लाख रुपये किमतीची ट्रॉली अवैध वाळूसह पकडण्यात आली. हा ट्रॅक्टर साईनाथ बाजीराव लोंढे (रा. रामनगर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास सहायक फौजदार गंगाधर भताणे करीत आहेत.