Three murders in a month in Vaijapur taluka, law and order situation worsens
नितीन थोरात
वैजापूर : तालुक्यात जून महिन्याची सुरुवात खंडाळ्यातील तरुणाच्या खुनाने झाली, तर शेवट एका महिला कीर्तनकार महाराजांची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली. ही हत्या जुन्या वादातून झाली की चोरट्यांनी केली, हे अद्याप अनुत्तरित आहे. तालुक्यात महिन्याची सुरुवात आणि शेवटही खुनाने झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.
मराठवाड्याची धार्मिक व ऐतिहासिक ओळख निर्माण करणारा हा तालुका गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी, हत्या, दरोडे व मोठमोठ्या घोटाळ्यांमुळे चर्चेत आहे. त्यामुळे तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे. कायदा-सुव्यवस्था वेशीवर टांगल्याचे दृश्य निर्माण झाले आहे.
वैजापूर उपविभागात वीरगाव, वैजापूर आणि शिऊर अशा तीन ठाण्यांची व्याप्ती आहे. मागील सहा महिन्यांत कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त्या काळात अनेक मोठ्या घटनांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी एकेकाळी गुन्हे शाखेची धुरा सांभाळणारे भागवत फुंदे यांनी डीवायएसपी पदभार स्वीकारला. त्यानंतरच या गंभीर घटना घडल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. एकाच महिन्यात तीन जणांचा बळी गेल्यानंतर आणि अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडल्यानंतर आता तरी वरिष्ठ अधिकारी गुन्हेगारी रोखण्यात यशस्वी होतात का, असा प्रश्न विचारला जात आहे.
महिला कीर्तनकाराच्या खुनाने तालुक्यात खळबळ उडालेली असतानाच, हत्या झालेल्या त्या रात्रीच अवघ्या शंभर मीटर असलेल्या मंदिरात झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये मंदिरात दोन व्यक्ती चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे या चोरांचा खुनाशी काही संबंध आहे का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, दोन्ही घटना एकाच रात्री आणि जवळील ठिकाणी घडल्याने हे दोन अज्ञात चोर संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
ज्या चिंचडगावात महिला कीर्तनकाराची हत्या झाली त्याच गावात सोमवारी (दि. ३०) मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यात काही मुद्देमाल चोरी गेला का? याची माहिती मात्र पुढे आलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा चिंचडगावकर हादरले आहे.
होणं, ही तालुका व शहराच्या दृष्टीने अत्यंत निंदनीय बाब आहे. कालची घटना अतिशय दुःखद व निषेधार्ह आहे.- डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते
ज्या दिवशी खून झाला, त्याच दिवशी जवळ असलेल्या मंदिराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती. चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही हत्या चोरट्यांनीच केली का, किंवा यामागे आणखी काही कारण आहे का हे स्पष्ट नाही. सर्व शक्य त्या अंगांनी तपास सुरू आहे.- शंकर वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक, वीरगाव पोलिस ठाणे.