Three children washed away in floods in Shiur, Pishore
शिऊर/पिशोर पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने नदी-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, त्यामुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. वैजापूर तालुक्यात एका घटनेत स्थानिक अल्पवयीन मुलगा, तर दुसऱ्या घटनेत परप्रांतीय मजुराचा मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेत परप्रांतीय मुलगा राज गुलाब ब्राह्मणी (१०) याचा मृतदेह आढळून आला आहे. दुसऱ्या मुलाचा शोध लागलेला नाही. तर तिसऱ्या घटनेत कन्नड तालुक्यात पिशोर येथे पूलावरुन जाणारा दहावर्षीय शाळकरी मुलगा तोल गेल्याने खाली पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.
वैजापूर तालुक्यातील कविटखेडा येथील गौरव कृष्णा शिंदे (१४) हा मुलगा लोणी-बोलठाण मार्गावरील नदीवरील पुलावरून जात असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. ही घटना घडताच आसपासचे ग्रामस्थ मदतीला धावले; मात्र प्रवाह अत्यंत जोरदार असल्याने त्याचा शोध लागला नाही. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पथक व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, दुसरी घटना तालुक्यातील अचलगाव शिवारात घडली. येथे शेतमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीय मजुराचा मुलगा राज गुलाब ब्राह्मणी (१०, रा. लखनगाव सेंधवा, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हा दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ओढ्यातील पाण्यात खेळत असताना अचानक वाहून गेला. शेतमजुरीसाठी आलेले इतर मजूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर मुलाचा मृतदेह काही वेळातच सापडला असून, शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे.
दोन्ही घटनांची माहिती मिळताच पोलिस व महसूल विभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली आहे. ग्रामस्थ व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तालुक्यातील सलग पावसामुळे अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंजना नदीत १० वर्षीय मुलगा वाहून गेला
पिशोर (ता. कन्नड) येथील बाजारपट्टीला लागून असलेल्या अंजना नदीवर आमराई रस्त्यालगत असलेल्या पुलावरून श्रावण निवृत्ती मोकासे (१०) हा चौथीतील विद्यार्थी सोमवारी (दि.२९) दुपारी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला सतत पूर येत आहे. अशातच हा लहान मुलगा पुलावरून जात असताना तोल जाऊन नदीच्या प्रवाहात पडला. स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे. याआधीही भरबा तांडा रस्त्यावर एक शाळकरी मुलगी वाहून जाताना थोडक्यात बचावली होती. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. हस्ता ते भिलदरी दरम्यान कुठेही सुरक्षित पूल नसल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नदी पार करत आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अंजना नदीवर तातडीने सुरक्षित पूल उभारण्याची जोरदार मागणी केली जात आहे.