Chhatrapati Sambhajinagar crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime : सहा कोटींचा अपहार : लोक आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघे गजाआड

चार महिन्यांपासून शहरातच लपाछपी; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहागंज भागातील लोक आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ५ कोटी ९६ लाख रुपयांचा घोटाळा करून चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या मुख्य सूत्रधारांना अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. आर्थिक गुन्हे शाखेने संस्थेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव या तिघांनाही शहरातूनच अटक केली.

अनिस समद पठाण (३५, अध्यक्ष, मूळ रा. चितेगाव, ता. पैठण, ह.मु. अंबिकानगर, मुकुंदवाडी), सय्यद एजाज अब्दुल गफ्फार (५०, उपाध्यक्ष, रा. तयबा हाईट्स, टाईम्स कॉलनी) आणि शेख विखार अहेमद शफीक अहेमद (३६, सचिव, रा. अंजुम हाईट्स, नागसेन कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. तिघांना न्यायालयाने २८ जुलैपर्यंत ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

शहागंज येथील या पतसंस्थेत २०२२ ते २०२५ या काळात संगणकीय प्रणालीचा पद्धतशीरपणे गैरवापर करण्यात आला. आरोपींनी बोगस व्हाऊचर आणि बनावट खाती तयार करून तब्बल ५ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी स्वतःच्या खासगी फर्ममध्ये वळवला होता. लेखापरीक्षण झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून लेखापरीक्षक द्वारकादास इधाटे यांच्या तक्रारीने अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह ११ संचालकांवर सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला होता. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच अध्यक्ष अनिस पठाण याच्यासह सर्व मुख्य आरोपी पसार झाले होते. गेल्या चार महिन्यांपासून सतत राहण्याची ठिकाणे बदलत होते. अखेर सोमवारी (दि.२०) पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक प्रताप साळवे यांच्या पथकाने केली.

घोटाळ्याच्या पैसा व्यवसायात ?

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी हा हडप केलेला पैसा स्वतःच्या विविध व्यवसायात आणि 'रिअल इस्टेट'मध्ये गुंतवल्याचा दाट संशय असून, त्या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे. या घोटाळ्यात आणखी कोणाचा हात आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT