Threatened for parking a two-wheeler in front of a hotel in Narali Baug; keys also snatched away
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
नारळी बाग परिसरात गुन्ह्याच्या तपासासाठी गेलेल्या उपनिरीक्षकाला हॉटेलसमोर दुचाकी उभी का केली असे म्हणत आरोपीने दमदाटी करत चावी हिसकावली. तू पोलिस असला तरी माझे काय वाकडे करणार, इथे यायचे नाही म्हणत हाकलून लावले. ही घटना रविवारी (दि.२२) दुपारी १२ वाजेच्या सुमारास जेपी इंटरनॅशनल हॉटेलसमोर घडली. प्रीतेश ऊर्फ बंटी जैस्वाल असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, शहरात दोन महिन्यांत पोलिसांवर हल्ल्याच्या पाच घटना घडल्या आहेत.
फिर्यादी राहुल विलास शिंदे (३१) यांच्या तक्रारीनुसार, ते सध्या सिटीचौक पोलिस ठाण्यात परीक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत. विवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका गुन्ह्याच्या अनुषंगाने गुप्त बातमीदाराला भेटण्यासाठी गेले होते.
नारळी बाग येथील जे. पी. इंटरनॅशनल हॉटेलच्या समोर विरुद्ध बाजूला त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली आणि ते बातमीदाराला भेटण्यासाठी थोडे बाजूला गेले. काही वेळाने परत आले असता, तिथे बंटी जैस्वाल आला आणि त्याने त्यांना तू पोलिस आहेस का? तुम्ही पोलिसवाल्यांनी इकडे यायचे नाही, ही मोटारसायकल इथे का लावली? असा जाब विचारत अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली.
तू चालत जा म्हणत हाकलून लावले
शिंदे यांनी उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. मात्र, आरोपीने शिवीगाळ करत, तू पोलिस आहेस म्हणून काय झाले? असे पोलिसवाले खूप बघितले आहेत, तू माझे काय वाकडे करणार आहेस, अशी अरेरावी केली. पोलिसांनी इथे यायचं नाही, तू इथून निघून जा, अशी धमकी देत त्याने शिंदे यांच्या हातातील दुचाकीची चावी हिसकावून घेतली. तसेच, मी तुला तुझी गाडी घेऊन जाऊ देणार नाही, तू चालत जा, असे म्हणत तेथून हाकलून लावले. वाद वाढू नये म्हणून शिंदे निघून आले. याप्रकरणी सिटी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंटी जैस्वालविरुद्ध यापूर्वी सिटी चौक, बेगमपुरा, सिडको पोलिस ठाण्यात एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.