There is also a tone of displeasure among the workers regarding Raju Vaidya and Gaikwad
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
आयात आणि प्रभागाबाहेरच्या उमेदवारांमुळे महापालिकेच्या प्रभाग २७ मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबतच मतदारांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हाच मुद्दा घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचा फटका भाजपचे उमेदवार राजू वैद्य, दया गायकवाड यांच्यासह इतर उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्या त्या पक्षाचे इच्छुक अनेक वर्षांपासून तयारी करत होते. मात्र ऐन-वेळी आयात उमेदवार दिले गेल्याने तेथील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. प्रभाग २७ मध्ये असाच प्रकार झाला आहे.
या ठिकाणी राजू वैद्य यांनी ऐन-वेळी शिवसेना उबाठातून भाजपात येऊन उमेदवारी मिळविली. वैद्य हे आयात तसेच बाहेरच्या प्रभागातील उमेदवार आहेत. यासोबतच याच प्रभागातून अ मधून भाजपने दया कैलास गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. कैलास गायकवाड हे मागीलवेळी इतर ठिकाणाहून निवडून आले होते. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांविरोधात स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
प्रभाग २७ मध्ये शिवसेना, शिव सेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांनी स्थानिक उमेदवार दिलेले आहेत. शिवाय त्याच पक्षाकडून अनेक वर्षांपासून तयारी करणारे आहेत. त्यामुळे आता या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी स्थानिक उमेदवार हवा की बाहेरचा या मुद्यावर प्रचाराचे रान उठविले आहे. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा फटका राजू वैद्य, गायकवाड यांच्यासह या प्रभागातील भाजपच्या इतर उमेदवारांनाही बसण्याची शक्यता आहे.
अपक्षांनी ठोकले दंड
प्रभाग २७ मध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात अपक्ष उमेदवारांनीही दंड ठोकले आहेत. या प्रभागातील ४ जागांसाठी १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. यात एका भाजप कार्यकर्तीचाही समावेश आहे. भाजपच्या आयात उमेदवारांविषयीची नाराजी दिसून येत आहे.