

800 employees again absent from election training.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ रुवारी (दि.८) दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृह या चार ठिकाणी झालेल्या या प्रशिक्षणास ७ हजार ५०० पैकी ८०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश निवडणूक अधिकारी तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.
महापालिका निवडणुकीसाठी २८ डिसेंबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे पहिले झाले. त्यानंतर गुरुवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यात निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ८ यांच्या कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या प्रशिक्षणालाही मोठ्याप्रमाणात कर्मचारी गैरहजर राहिले.
त्यामुळे आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु त्यानंतर कारणे दाखवा नोटीस देत कारवाई करणे टाळले. मात्र दुसऱ्या प्रशिक्षणालाही चारही स्थळांवर एकूण ८०० कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याचे आयुक्तांना आढळले.
आता या दांडीबहाद्दरांना माफी मिळणार नाही. त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यापीठ सभागृह येथे निर्भीडपणे आणि पारदर्शक निवडणूक घेणे, लोकशाही टिकवून ठेवणे ही शासकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. असे असतानाही जे कर्मचारी प्रशिक्षणाला गैरहजर राहिले त्यांच्यावर नक्कीच गुन्हे दाखल होणार आहेत.