Vegetables : वांगी, गिलके, दोडक्याचे दर कडाडले; टोमॅटो, फ्लॉवरच्या भावात घसरण file photo
छत्रपती संभाजीनगर

Vegetables : वांगी, गिलके, दोडक्याचे दर कडाडले; टोमॅटो, फ्लॉवरच्या भावात घसरण

शहरातील भाजीपाला बाजारात सध्या दरांची चढउतार सुरू असून, काही भाज्यांनी गृहिणींचे आर्थिक गणित बिघडवले आहे

पुढारी वृत्तसेवा

There are currently fluctuations in prices at the city's vegetable market

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील भाजीपाला बाजारात सध्या दरांची चढउतार सुरू असून, काही भाज्यांनी गृहिणींचे आर्थिक गणित बिघडवले आहे, तर काहींच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. वांगी, गिलके, दोडके, श्रावण घेवडा आणि दिलपसंदच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, हिरवी मिरची आणि लिंबू स्वस्त झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळत आहे.

गुलमंडी, शहागंज आणि टीव्ही सेंटर परिसरातील किरकोळ बाजारात वांग्याचे भाव किलोमागे ८० रुपयांवरून थेट १०० रुपयांवर गेले आहेत. गिलके आणि दोडक्यानेही शंभरी ओलांडत १२० रुपयांचा टप्पा गाठला आहे. श्रावण घेवड्याच्या दरात तब्बल ४० रुपयांची वाढ होऊन तो १६० रुपये किलो झाला आहे.

दिलपसंदचे भावही १०० वरून १२० रुपयांवर पोहोचले आहेत. भोपळ्याच्या दरातही १० ते २० रुपयांची वाढ होऊन तो ६० रुपये किलोने विकला जात आहे. गाजर आणि कारल्यासाठी किलोमागे १०० रुपये मोजावे लागत आहेत. भेंडी आणि सिमला मिरची प्रत्येकी ८० रुपये किलो आहे.

मात्र, पालेभाज्यांची आवक समाधानकारक असल्याने मेथी, शेपू, पालक आणि कोथिंबीर यांसह विविध पालेभाज्या अवघ्या १५ रुपये जुडीने मिळत आहेत. महागाईच्या या वातावरणात टोमॅटोचे दर ६० वरून ५० रुपये, काकडीचे ८० वरून ७० रुपये, फ्लॉवरचे ८० वरून ६० रुपये, तर हिरव्या मिरचीचे ७० वरून ६० रुपये किलो झाले आहेत. लिंबाचे भावही २०० वरून १६० रुपयांवर आले आहेत. बटाटे ३०, कांदा ६० ते ७० आणि कोबी ४० रुपये किलो आहे. वाल ८० ते १००, शेवगा १६०, आले १५० ते २५०, तर लसूण २५० ते ४०० रुपये किलोने विकला जात आहे.

दरवाढीने बिघडले बजेट

भाजीपाल्याच्या वाढत्या दरांमध्ये पालेभाज्यांची मुबलक आवक ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली आहे. मेथी, शेपू, पालक आणि कोथिंबीर यांसह विविध पालेभाज्या केवळ १५ रुपये जुडीने मिळत असल्याने रोजच्या स्वयंपाकाचे आर्थिक गणित काहीसे सावरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT