Then we will demand cancellation of GR of 1994: Manoj Jarange's warning
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आर-क्षणाचा विषय मरेपर्यंत मी सोडणार नाही. सध्या आरक्षण जवळ आले असून, जर कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर त्याला सोडणार नाही. सरकारने जर हा निर्णय मागे घेतला किंवा कोणी जीआरला चॅलेंज केले तर आम्ही १९९४ चा जीआर रद्द करण्याची मागणी करू, असा इशारा देतानाच १९६७ नंतर १८० जाती आरक्षणात आल्या, त्यातील काही जाती कुठल्या आधारावर घालण्यात आल्या, याचा जाब सरकारला विचारणार असून, मंडल आयोगाने १४ टक्के आरक्षण दिले, त्यानंतर आणखी १७५ जाती कशा घुसवल्या? याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली.
शुक्रवारी (दि.३) त्यांनी शहरातील गॅलक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असता माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पुढे म्हणाले, ज्यांच्या आडनावावर कुणबी प्रमाणपत्र निघाले आहे, त्यांनीच नाही तर सारखे आडनाव असलेल्यांनीही अर्ज करावा. तसेच कोल्हापूर, सातारा, औंध संस्थानाचे गॅझेट लागू करा. शिंदे समितीला नोंदी शोधायला लावा. गॅझेटप्रमाणे अर्ज स्वीकारा. गॅझेटनुसार नोंदी असताना अर्ज नाकारणे ही अन्यायाची परिसीमा आहे.
हे थांबायला हवे. सरकार वेळकाढूपणा करत असेल तर दिवाळीनंतर जन-तेचा उद्रेक होणार, अशी चेतावणी त्यांनी दिली. मागण्या मान्य झाल्या नाही तर दिवाळीनंतर आंदोलन पुन्हा पेटणार आणि यावेळी ते केवळ मराठा नव्हे तर शेतकरी, धनगर, मुस्लिम आरक्षण व कर्जमाफी, हमीभाव, आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी असेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घोळ घालू नये, असेही ते म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला फाशीने घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. महादेव मुंडे, गीते हत्याकांडातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. काहींवर मोक्का रद्द केला गेला, यामागे कोण राजकारण करतेय, ते आम्ही उघड करणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
रक्ताने माखलेले हात घेऊन आमच्या जातीविरोधात बोलू नका. बंजारा समाजाच्या नावावर तुम्ही आरक्षण घेतले आणि मराठ्यांवर टीका करता? आम्ही तुमच्या नादी लागू नये हेच बरे. नाही तर तुमच्यासह अजित दादांचाही राजकीय देव्हारा करू, नाव न घेता असा इशारा आमदार धनंजय मुंडे यांना जरांगे यांनी दिला.