Theft at the Hanuman temple in Padampura.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्टेशन रोडवरील पदमपुरा परिसरातील हनुमान मंदिरात मूर्तीला छन्नी हतोड्याचा घाव घालून मूर्तीच्या कपाळावरील सोन्याचा पत्रा, चांदीच्या भुवया, कपाळावरील त्रिशूळ काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२४) पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आला. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून या घटनेच्या हनुमान भक्तांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
शहरातील सर्वाधिक सुरक्षितेचे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळस ळाट झाला आहे. पोलिसांच्या घरात धाडसी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी आता मंदिरही सोडले नसल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील पदमपुरा येथील हनुमान मंदिरात चोरी झाल्याचे सकाळी पाच वाजता साफ-सफाईचे काम करणाऱ्या लक्ष्मीबाई चक्रवार यांच्या लक्षात आली. त्यांनी ही बाब संजय बारवाल यांना सांगितली.
माहिती मिळताच संजय बारवाल यांनी मंदिरात धाव घेतली असता चोरट्यांनी मंदिरातील दहा हजार रुपये किमतीचा सोन्याच्या पत्र्याचा टिळा, ५ हजार रुपये किमतीचे चांदीच्या भुवया, १५ हजार रुपये किमतीचे पायातले कडे, २ हजार रुपये किमतीचे कपाळावरील चांदीचे त्रिशूळ आणि अडीच लाख रुपयांचे दानपेटीतील कपाटातील रोकड असा एकूण २ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी संजय बारवाल यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद
शनिवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान मंदिरात टोपी व जॅकेट परिधान केलेले चार चोरटे बुटासह मंदिरात गेट तोडून शिरले. त्यांनी सुरुवातील मंदिरातील काचेचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर कपाटातील जवळपास अडीच लाख रुपयांची रक्कम घेतली. तसेच मूर्तीवर चढविण्यात आलेले सोन्या -चांदीचे आभूषण थेट छन्त्री हातोड्याने मूर्तीवर घाव घालून सोन्याचा टिळा, चांदीचे त्रिशूळ आणि भुवया काढून घेत मूर्तीची विटंबना केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.