Theft Case : कोकणवाडीतील मंदिरात चोरी; खिडकीचे गज तोडून आत प्रवेश file photo
छत्रपती संभाजीनगर

Theft Case : कोकणवाडीतील मंदिरात चोरी; खिडकीचे गज तोडून आत प्रवेश

बाप्पांचे चांदीचे डोळे अन् बाळकृष्णाच्या मूर्ती पळवल्या

पुढारी वृत्तसेवा

Theft at Temple in Konkanwadi; Breaking through a window and entering

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोकणवाडी भागातील सिद्धिविनायक गणेश मंदिराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी श्री गणपती मूर्तीचे चांदीचे डोळे, बाळकृष्णाच्या दोन पितळी मूर्ती आणि गल्ल्यातील चिल्लर असा ऐवज लंपास केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी (दि.२२) मध्यरात्री घडली. मंदिरातच चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष विजय लक्ष्मण वाघचौरे (५०, रा. कोकणवाडी) यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विजय वाघचौरे हे २०१२ पासून कोकणवाडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराचे अध्यक्ष आहेत. मंदिरात १७ मे पासून भागवत सप्ताह सुरू असल्याने दररोज पहाटे ५.३० वाजता काकड आरती केली जाते.

शुक्रवारी (दि.२२) रात्री १० वाजेच्या सुमारास वाघचौरे हे नेहमीप्रमाणे मंदिराचे मुख्य चॅनेल गेट बंद करून घरी गेले होते. शनिवारी (दि.२३) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते काकड आरतीसाठी मंदिरात आले. त्यांनी गेट उघडून आत प्रवेश केला असता, मंदिराच्या डाव्या बाजूच्या खिडकीचे गज तुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ पाहणी केली असता मंदिरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.

चोरट्यांनी मंदिराची खिडकी तोडून आत प्रवेश केला. यानंतर श्री गणपती मूर्तीचे दोन चांदीचे डोळे, दर्शनासाठी ठेवलेल्या बाळकृष्णाची एक मोठी व एक छोटी अशा दोन पितळी मूर्ती आणि गल्ल्यातील ५ व १० रुपयांची नाणी (अंदाजे ८०० रुपये) असा एकूण ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास हवालदार दिलीपकुमार शेवाळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT