The voice of a student of Nillod's Warkari Institute resonated in the state
राजु वैष्णव
सिल्लोड : तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रमच्या विद्यार्थ्यांचा आवाज चक्क राज्यात गुंजत आहे. क्षिती जोग निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या आगामी चित्रपटातील शाळा मराठी हे गीत विद्यार्थी रोहित जाधव याने गायिले आहे. नुकतेच हे गीत प्रदर्शित झाले असून राज्यभर हे गीत गाजत आहे.
वारकरी संस्थेत रोहित शिक्षण घेत असताना त्याला गायनाचा छंद लागला. वयाने लहान असल्याने तो बोबड्या आवाजात गात असे. यामुळे त्याचा आवाज अधिकच मधुर लागत होता. त्याने प्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे यांनी गायिलेली राधे राधे खरं सांग ही गौळण बोबड्या आवाजात लाधे लाधे खरं सांग अशी गायिली. त्याची ही गौळण सोशल मीडियावर व्हायरल झाली व मोठा प्रतिसाद मिळाला.
हीच गौळण ऐकून संगीत दिग्दर्शन हर्ष विजय (द फोक आख्यान) यांनी ऐकली व चिमुकल्या विद्यार्थ्याला गाण्याची संधी उपलब्ध करून दिली. क्षिती जोग निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर यातील शाळा मराठी हे गीत प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे गीत लेखन ईश्वर ताराबाई अंधारे यांनी तर संगीत दिग्दर्शन हर्ष-विजय हे आहे. चित्रपटात अभिनेते सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपूटकर, अभिनेत्री प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम असे नामवंत कलाकार आहेत. नामवंत कलाकार, संगीतकार, गीत लेखनांसोबत काम करण्याची संधी निल्लोड फाट्यावरील श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रमच्या विद्यार्थ्याला मिळाली आहे, हे विशेष.
रोहित जाधव गणोरी (ता. फुलंब्री) येथील असून घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आजोबांनी शिक्षणासाठी श्री माऊली वारकरी गुरुकुल आश्रमात टाकले. तसे या संस्थेत अनेक अनाथ, गोरगरिबांच्या मुलांना मोफत वारकरी संप्रदायासह इतर शिक्षण दिले जाते. हभप रामेश्वर महाराज गेल्या सोळा सतरा वर्षांपासून ही संस्था चालवत आहे.
लाधे- लाधेने घातली भुरळ
लहान मुलांमध्ये अनेक कलागुण असतात. मात्र त्याला वाव मिळणे तेवढेच गरजेचे आहे. हा चिमुकला लहान असताना बोबडा बोलत असला तरी लाधे लाधे खरं सांग या गायिलेल्या गौळणीने त्याला आज राज्यात पोहचवले आहे. तर नुकतेच प्रदर्शित झालेले क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम चित्रपटातील शाळा मराठी या गीताने तर संगीत रसिकांना मधूर आवाजाची भुरळ घातली आहे. त्याच्या या यशामुळे संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापकांसह शिक्षकांना मोठा आंनद झाला आहे.