Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा file photo
छत्रपती संभाजीनगर

Farmers worried : पाऊस कधी येणार याचीच सर्वत्र चर्चा

आभाळाकडे नजरा : खरीप हंगामाची सुरुवात रखडल्याने शेतकरी हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

The talk everywhere is about when the rain will arrive

कन्नड / देवगाव रंगारी, पुढारी वृत्तसेवा : जून महिना अर्ध्यावर आला, आषाढाची चाहूल लागली, तरीही पावसाने हजेरी लावलेली नसल्याने देवगाव रंगारीसह परिसरातील शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडले आहेत. गावोगावी चावडीवर, शिवारात, कृषी सेवा केंद्रांवर आणि बाजारपेठांमध्ये सध्या एकाच विषयाची चर्चा रंगत आहे पाऊस कधी येणार प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यांत अपेक्षा दिसून येत आहेत. पेरणीयोग्य पावसाअभावी खरीप हंगामाची सुरुवात रखडली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

खरीप हंगाम हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. याच हंगामातील उत्पन्नावर शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मुलांचे शिक्षण, घरखर्च, शेतीची पुढील गुंतवणूक, बँकांचे कर्ज आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी खरीप हंगामाकडे मोठ्या आशेने पाहत असतो. त्यामुळे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे लागलेली असते. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे.

परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मशागतीची सर्व कामे पूर्ण केली आहेत. ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी, रोटाव्हेटरची कामे करून शेत पेरणीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि बाजरी यांसारख्या पिकांचे बियाणे खरेदी करून घरात साठवून ठेवले आहे. तर खते आणि कीटकनाशकांचीही खरेदी पूर्ण केली आहे. मात्र पाऊस नसल्याने ही सर्व तयारी सध्या निष्क्रिय ठरली आहे.

शेतीसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बियाण्यांचे वाढते दर, खतांच्या किमती, डिझेलचा खर्च, मजुरी आणि यंत्रसामग्रीचा वाढलेला भाडे दर यामुळे शेती करणे अधिक खर्चिक झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले असून काहींनी खासगी सावकारांकडूनही पैसे उभे केले आहेत. पाऊस उशिरा झाल्यास या सर्व गुंतवणुकीवर आर्थिक संकट येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

वेळेत पेरणी न झाल्यास त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होतो. कृषी तज्ज्ञांच्या मते, पेरणी उशिरा झाल्यास पिकांचा वाढीचा कालावधी कमी होतो, रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. म्हणूनच प्रत्येक दिवसागणिक पावसाची प्रतीक्षा अधिकच असह्य होत आहे.

यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या मनातील भीती वाढत आहे. काही भागांमध्ये पावसाचा हलका शिडकावा झाला असला तरी तो पेरणीयोग्य नसल्याने तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

चारा - पाण्याची चिंता

वाढत्या तापमानामुळे जनावरांच्याही अडचणी वाढल्या आहेत. शेतातील नैसर्गिक चारा कमी होत असून विहिरी, शेततळी आणि पाण्याचे स्रोत हळूहळू आटत आहेत. त्यामुळे पशुपालक शेतकरीही चिंतेत आहेत. पाऊस आणखी लांबल्यास चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT