The sting of the 'October heat' felt as early as September
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहर व परिसरात सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा चटका वाढला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात शहर दंग असतानाच वातावरणातील उष्णतेने नागरिकांची काहिली होत आहे. पावसाळी वातावरण अपेक्षित असताना गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका आणि वाढलेल्या दमटपणामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. सकाळी ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळत असला तरी सूर्य वर येताच उकाडा वाढतो. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जाणवत आहे.
सप्टेंबरमध्ये पावसाळी वातावरण अपेक्षित असताना गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका आणि वाढलेल्या दमटपणामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. तसेच गणेशोत्सवामुळे बाजारपेठा, प्रमुख रस्ते यासह गणेश मंडळांच्या परिसरात दिवसभर गर्दी होत आहे. गणरायाच्या दर्शनासह खरेदी आणि विविध कार्यक्रमांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ सुरू आहे.
मात्र, दुपारच्या उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी अनेकजण रस्त्यालगतच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत.
दरम्यान उत्सवामुळे रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्ते आणि मंडळांच्या परिसरात नागरिकांची गर्दी कायम आहे. त्यामुळे दिवसा वाढता उकाडा आणि रात्री गणेशोत्सवाची लगबग, अशा वातावरणात यंदाचा उत्सव सुरू आहे. पावसाळा संपण्यास अद्याप अवकाश असतानाच वाढलेली उष्णता नागरिकांच्या चांगलीच जाणवत आहे.
अन् पुन्हा उन्हाचा तडाखा
पावसाळ्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण होतो. यंदाही शहरात पाऊस झाला; मात्र उघडीप मिळताच उन्हाचा प्रभाव पुन्हा वाढला आहे. सकाळी वातावरण तुलनेने आल्हाददायक असते. त्यानंतर सूर्याची तीव्रता वाढत असल्याने उकाडाही जाणवत आहे. या दमट हवेमुळे दुपारच्या वेळी घामाच्या धारा वाढल्या आहेत.
ऊन-पावसाचा खेळ
शहरातील कमाल तापमान आगामी काही दिवस ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी पावसाची शक्यताही कायम असल्याने वातावरणातील बदल सुरूच आहेत. सकाळी ढगाळ किंवा पावसाळी वातावरण आणि दुपारी उन्हाचा चटका, अशी स्थिती सध्या शहरात अनुभवायला येत आहे.