The second wife threw her husband down from the balcony
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
पहिल्या पत्नीसह सुखाचा संसार सुरू असताना फेसबुकवर जुळलेल्या प्रेमातून केलेल्या दुसऱ्या लग्नाची भयंकर परिणती समोर आली आहे. सोन्याचे दागिने परत मागितल्याच्या रागातून दुसऱ्या पत्नीने पतीला चक्क फ्लॅटच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून खाली ढकलून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना रविवारी (दि.१०) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास विशाल नगर भागात घडली. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून त्याच्या चार बरगड्या आणि कमरेचे हाड फॅक्चर झाले आहे.
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका पवार/राठोड (रा. विशाल नगर) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. फिर्यादी संदीप धुम्मा राठोड (३४, मूळ रा. आडगाव चिंचोली, ह. मु. वाळूज महानगर) यांच्या तक्रारीनुसार, ते आपली पहिली पत्नी वर्षा, मुलगा आणि मुलगी यांच्यासह वाळूज भागात राहतात व इलेक्ट्रिक बाईक मार्केटिंगचे मध्ये फेसबुकद्वारे त्यांची प्रियंका हिच्याशी ओळख झाली होती.
या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये एस क्लब येथे प्रियंकासोबत लग्न केले. संदीप यांनी डिसेंबर २०२५ मध्ये या दुसऱ्या पत्नीला विशाल नगर येथील शिवमंगल अपार्टमेंटमध्ये १७ हजार रुपये भाड्याने फ्लॅट घेऊन दिला होता. ते अधूनमधून या दुसऱ्या पत्नीकडे आणि मुलाकडे जात असत.
आईसाठी पैसे मागून घातला वाद
९ मे रोजी सायंकाळी संदीप दुसऱ्या पत्नीच्या फ्लॅटवर गेले होते. तेथून मित्राच्या मुलाच्या लग्नाला जाऊन ते मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास परतले. यावेळी त्यांनी प्रियंकाकडे जेवण मागितले असता तिने नकार दिला व स्वतःच्या आईसाठी १० हजार रुपयांची मागणी करत वाद घातला.
दागिने परत मागताच गॅलरीतून ढकलले
संदीप यांनी तिच्याकडे ठेवलेल्या ९ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या आणि पावणेतीन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट परत मागितले व त्यानंतर पैसे देतो असे सांगितले. दागिन्यांच्या या कारणावरून दोघांचे भांडण झाले. रागाच्या भरात प्रियंकाने तू आता मर, तुला ब्रेसलेट व अंगठ्या देत नाही असे म्हणत संदीप यांना थेट दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खाली ढकलून दिले. संदीप यांच्यावर सध्या रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा काळे करत आहेत.