The scientific mystery of the mud plaster of the Aurangabad Buddhist caves has been unraveled
जे.ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन प्रशासन विभागाने औरंगाबाद बौद्ध लेण्यांवरील मड प्लास्टर (मातीचा गिलावा) संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनामुळे प्राचीन भारतीय वारसा संवर्धन क्षेत्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लेण्यांच्या निर्मितीच्या काळात वापरण्यात आलेली माती आणि सेंद्रिय साहित्य नेमके कोठून आणले जात होते, याचा शास्त्रीय पद्धतीने उलगडा करण्यात आला आहे.
पर्यटन प्रशासन विभागाचे प्रा. डॉ. राजेश रगडे, प्रा. डॉ. माधुरी सावंत आणि डॉ मॅनेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन राबविण्यात आले. अभ्यासादरम्यान लेण्यांच्या भिंतींवरील मड प्लास्टरचे FTIR, XRD, ICP-MS, SEM-EDX यासारख्या आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांद्वारे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनात मड प्लास्टरमध्ये कॅल्साइट, काओलिनाइट, क्वार्ट्स यासारखी खनिजे आढळून आली असून, कॅल्साइट टिकाऊ बंधक म्हणून वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच सेंद्रिय बंधक आणि नैसर्गिक चिकट द्रव्यांचा वापर केल्याचेही निदर्शनास आले आहे.
हर्सल तलावातील मातीचा वापर
संशोधनातील महत्त्वाचा शोध म्हणजे लेण्यांच्या परिसरातील प्राचीन हर्सल तलाव. या तलावातील मातीचे नमुने लेण्यांवरील मड प्लास्टरच्या रासायनिक रचनेशी जुळत असल्याचे आढळले आहे. यावरून लेणी खोदताना आणि भित्तीचित्रांसाठी याच तलावाची माती वापरण्यात आली असावी, असा ठोस निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
वारसा संवर्धनासाठी उपयुक्त संशोधन या संशोधनाच्या आधारे लेण्यांच्या संवर्धनासाठी मूळ प्लास्टरशी सुसंगत, पर्यावरणपूरक पारंपरिक मिश्रण विकसित करण्यात येत आहे. औरंगाबाद बौद्ध लेण्यांमध्ये ही पद्धत प्रत्यक्षात वापरण्यात आली असून, यामुळे प्राचीन स्थापत्य टिकवून ठेवण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे.
देशातील पहिला पर्यटन विभाग
जगभरात अनेक विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आहेत ज्या वारसा स्थळांवर वैज्ञानिक संशोधन करतात, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यटन प्रशासन विभाग हा भारतातील पहिला आहे ज्याने या संशोधनासाठी पुढाकार घेतला आहे. या संशोधनाद्वारे त्यांनी भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणाली आणि प्राचीन बांधकाम साहित्याचा वापर शोधून काढला आहे. २०१४ पासून डॉ. राजेश रगडे आणि डॉ. माधुरी सावंत यांनी पर्यटन आणि वैज्ञानिक वारसा संशोधन प्रकल्प राबवून देशातील पर्यटन वारसा संशोधन क्षेत्राला नवीन दिशा दिली आहे. वैज्ञानिक वारशावरील २२ संशोधन शोधनिबंध स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
संशोधनातून ही मिळाली माहिती
मड प्लास्टरसाठी स्थानिक माती व नैसर्गिक सेंद्रिय साहित्याचा वापर
हसूल तलाव हे मातीचे प्रमुख स्रोत
कॅल्साइटयुक्त प्लास्टर टिकाऊ आणि हवामानसुसंगत
प्राचीन पारंपरिक ज्ञानावर आधारित आधुनिक संवर्धन तंत्र विकसित