City Bus : प्रवासी संख्येनुसार ठरणार शहर बसच्या फेऱ्यांचे नियोजन file photo
छत्रपती संभाजीनगर

City Bus : प्रवासी संख्येनुसार ठरणार शहर बसच्या फेऱ्यांचे नियोजन

अधिक प्रतिसाद असलेल्या मार्गांना प्राधान्य : १०० ई-बसनंतर सार्वजनिक वाहतुकीला नवे स्वरूप

पुढारी वृत्तसेवा

The scheduling of city bus trips will be determined based on passenger volume

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहर बससेवेचे फेरनियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्या मार्गावर बसफेऱ्या वाढविणे, तर कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावरील फेऱ्यांमध्ये कपात करण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. अशी माहिती शुक्रवारी (दि.२२) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. सध्या डिझेलवर धावणाऱ्या स्मार्ट बससेवा नो लॉस, नो प्रॉफिट तत्त्वावर सुरू आहेत. मात्र इंधन खर्चामुळे आर्थिक ताळमेळ राखणे आवश्यक बनले असून त्यानुसार बससेवेचे नियोजन करण्यात येत असल्याचे शुक्रवारी आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

तसेच ज्या मार्गावर अधिक प्रवासी संख्या आहे. त्या मार्गावर बससेवा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यात विशेषतः जुन्या शहर भागात बससेवा सुरू करण्याबाबत संबंधित एजन्सीला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्या वाढण्यासह बससेवेच्या उत्पन्नातही वाढ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शहर बसच्या दुरुस्ती व देखभालीकडेही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. प्रधानमंत्री योजनेंतर्गत शहराला १०० ई-बस उपलब्ध होणार असून त्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. वातानुकूलित ई-बस सेवेमुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, असा विश्वास आयुक्त येडगे यांनी व्यक्त केला. तसेच पुणे शहराच्या धर्तीवर सक्षम लोकल ट्रान्सपोर्ट व्यवस्था उभारण्याचा मनपाचा मानस असल्याचेही आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले.

औद्योगिक भागांसाठी वाढीव बस

वाळूज, रांजणगाव, चिकलठाणा आणि अन्य औद्योगिक परिसरांमध्ये कामगारांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने त्या मार्गावरील बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच बिडकीन, वेरूळ, फुलंब्री या सारख्या शहरालगतच्या भागांसाठीही बससेवा सुरू असून विद्यार्थी व नोकरदार वर्गाला त्याचा मोठा लाभ होत असल्याचे आयुक्त येडगे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT