The recruitment for 227 municipal corporation posts will take place after the Zilla Parishad elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या २२७ पदांसाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच जाहिरात निघेल, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
महापालिकेसाठी शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार मंजूर पदांची संख्या ५२०२ एवढी आहे. त्यापैकी सुमारे २४०० कर्मचारी सध्या कार्यरत असून तब्बल २८०० हून अधिक पदे रिक्त आहेत. गतवर्षी यातील १२४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता या भरतीतील उर्वरित जागा आणि नव्याने विविध १२ पदांच्या २७२ जागांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, लिपिकांची ५० पदे वगळून महापालिकेने २२७ पदांसाठी जाहिरात प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, त्यापूर्वीच महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकानंतर भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आली होती. मात्र, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे या निवडणुकांमध्ये भरतीची जाहिरात काढण्यासाठी महापालिकेने आयोगाकडे परवानगी मागितली. परंतु, जि.प. निवडणुकीनंतर जाहिरात काढावी, असे आदेश आयोगा महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे आणखी दोन आठवड्यानंतरच भरतीची जाहिरात निघेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या जागांसाठी होणार भरती प्रक्रिया
रोखपाल -१२
उद्यान सहायक -०९
अनुरेखक - ०९
चालक यंत्रचालक-१७
सहायक सुरक्षा अधिकारी -०१
उपअनशिमन केंद्र अधिकारी -०४
कनिष्ठ अभियंता स्थापत्य - ३२
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - २४
स्वच्छता निरीक्षक -१२
अग्निशामक - १००
पशुधन ०७