

The mayoral election will be held in the second week of February
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिका निवडणुकीनंतर आता शहराचे २३ वे महापौर कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे. पंरतु, सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची घाई सुरू असून २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे यानंतरच महापालिकेत सत्ता स्थापन्यासाठी राजकीय पक्ष गटांची नोंदणी करेल, अशी शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूक होईल, असे भाजपच्या नेत्यांनी दिले आहेत.
महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारीला लागला. त्यामुळे आता सर्वाचे लक्ष हे महापौरपदाकडे लागले आहे. महापालिकेवर एक हाती सत्ता स्थापनेसाठी ५८ सदस्यांची गरज आहे. भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमताला केवळ एक सदस्य कमी आहे. मात्र, असे असतानाही अद्याप महापौरपदाच्या निवडीसाठी भाजपकडून कुठलीच हालचाल सुरू झालेली नाही. भाजपने जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वातच लढली आणि त्यात भरघोस यशही भाजपला आले आहे. आता तसेच यश जिल्हा परिषद निवडणुकीत मिळविण्यासाठी मंत्री सावे यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
पुढील दोन दिवस भाजपचे हे सर्व नेते जिल्हा परिषद निवडणूक रिंगणातील पक्षाचे बंडखोर उमेदवार थंड करण्यात व्यस्त राहणार आहेत. २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या रणधुमाळीतच भाजपकडून महापालिकेसाठी गटांची नोंदणी होणार आहे. याबाबत मंत्री सावे म्हणाले की, दोन दिवसांनंतर गटाची नोंदणी होणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी राजकीय पक्षांना गटाच्या नोंदणीचे पत्र दिले आहेत. मात्र, ही गट नोंदणी २७जानेवारीनंतर होण्याची शक्यता असून त्यानंतरच विभागीय आयुक्तांकडून महापौर पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित होणार आहे. या निवडणुसाठी आठ दिवसांची द्यावी लागते.
इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग
भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असून खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्याने अनेकजण इच्छुक झाले आहेत. या इच्छुकांची यादी भाजपच्या कोअर कमिटीकडून अंतिम करून प्रदेश कार्यकारिणीला सादर केली जाणार आहे. त्यावर प्रदेशाकडूनच महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होणार आहे.
यंदा नियमावलीत बदल
गटनेता नोंदणीसंदर्भात यावेळी नियमावलीत बदल केला आहे. यापूर्वी गटातील नगरसेवकांना विभागीय आयुक्तालयात सोबत नेऊन तेथेच स्वाक्षरी करून गटाची नोंदणी आणि गटनेते नियुक्त केले जात होते. यंदा नोंदणी करताना आठ प्रकारात माहिती द्यावी लागणार आहे. गटनेत्याचे गट नोंदणीबाबतचे शिफारसपत्र, गटाच्या बैठकीचे पत्र, गट नोंदणीबाबत सदस्याला पत्राची पोच, गटनेता निवडीबाबतचा ठराव, गटाचे नियम व विनियम, घटनेची प्रत, बैठकीत इतर ठराव झाले असतील. तर त्याची नोंद असलेली प्रत, सदस्य म्हणून निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची मूळ प्रत, आधार कार्ड झेरॉक्स, दोन फोटोसह देणे बंधनकारक आहे.