The Public Works Department is constructing a new arch on Jalna Road between Chikalthana and Cambridge Chowk.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते केंब्रिज चौकादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने जुनी कमान असताना ८ कोटी रुपये खर्चुन नव्याने सिमेंट काँक्रीटची कमान उभारण्याचा घाट रचला आहे. विशेष म्हणजेच या रस्त्याचे येत्या वर्षभरात रुंदीकरण होणार आहे. शिवाय, स्मार्ट सिटीने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प आराखड्यात (डीपीआर) उड्डाणपूलही नियोजित आहे. असे असताना केवळ एक ते दीड वर्षासाठी उधळपट्टीचा प्रयत्न सुरू आहे.
ऐतिहासीक शहरात देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळेच महापालिकेने शहरातील सर्व एन्ट्री पॉइंट म्हणजेच प्रवेशद्वार हे सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पेडेको या संस्थेकडून पैठण रोड, बीड बायपास, जालना रोड, मुंबई रोड, हर्सल रोड या पाच प्रमुख रस्त्यांसाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. हा डीपीआर शासनाकडे सादर करून त्यास मंजुरी मिळविण्यात येणार आहे.
यात चिकलठाणा ते केंब्रिज शाळा चौक रस्त्याचाही समावेश आहे. या चौकात एक जुनी सुस्थितीत असलेली दिशादर्शक कमान सध्या अस्तित्वात आहे. मात्र असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या कमानीपासून केवळ ५० मीटर अंतरावरच एक नवी सिमेंट काँक्रीटची कमान उभारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे रस्ता वर्षभरात रुंद होणार आहे, याची माहिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल ८ कोटी खर्चाची कमान उभारण्याचे कंत्राट निश्चित करून त्याचे कार्यारंभ आदेश दिले. मात्र ऐन अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाल्यावर झोपेचे सोंग घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम काही दिवसांसाठी स्थगित केले अन् आता पुन्हा काम सुरू केले आहे.
अधिकाऱ्यांचा माहिती देण्यास नकार
कमानीचे काम बंद केल्यानंतर पुन्हा सुरू कसे झाले, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.
कमान वर्षभरात तोडावी लागेल
महापालिका निवडणुकीनंतर शासन या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधी देईल, अशी शक्यता काही राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आताच ८ कोटी रुपये खर्चुन कमान उभारण्याची घाई प्रशासनाला कशासाठी आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.