The plight of depositors due to closure of credit institutions; Fight to the death due to lack of money for treatment
सचिन जिरे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श समूह, अजिंठा अर्बन बँक, ज्ञानराधा मल्टिस्टेस्ट, छत्रपती मल्टिस्टेट, राजस्थानी मल्टिस्टेट यांसारख्या अनेक पतसंस्था व बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याने बुडाल्या. परिणामी शेकडो ठेवीदारांना अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
लाखो रुपये या पतसंस्थांमध्ये अडकल्याने अनेकजण उपचारासाठी पैसे नसल्याने मृत्यूशी झुंज देत आहेत, काही जण भीक मागून जगत आहेत, तर काहींच्या मुलींची लग्ने आणि घराचे स्वप्न भंगले आहे. वर्षानुवर्षे साठवलेले पैसे अडकले, हजारो ठेवीदारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
पिशोर गावात पुढारी न्यूजची टीम गेल्यावर अनेक वृद्ध, महिला, पुरुष, आजारी व्यक्तींनी गर्दी केली होती. आपल्या व्यथा सांगताना अनेकांचा हुंदका दाटून आला. घर, जमीन, शेती विकून जमवलेली रक्कम गमावली असून, सरकारकडून मदतीची मागणी केली जात आहे. पुढारी न्यूजने अशा काही ठेवीदारांच्या घरी भेट देऊन वास्तव जाणून घेतले.
येत्या काळात सरकारने लक्ष देऊन ठेवीदारांची मूळ रक्कम आणि व्याजाची परतफेड करावी, अशी ठेवीदारांची विनंती आहे. अन्यथा अजूनही अनेक कुटुंबांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते.
" कन्नड तालुक्यातील पिशोर गावचे रहिवासी रामचंद्र मोकाशे यांनी आपल्या सहा गुंठे जमिनीची विक्री करून तीन लाख रुपये आदर्श समूहामध्ये ठेवले होते. मिळणाऱ्या व्याजातून मेसचे जेवण आणि औषधोपच-ाराचा खर्च भागवला जात होता. मात्र, बँक बंद झाल्यानंतर त्यांना ना मूळ रक्कम मिळाली, ना व्याज. सध्या ते लोकांकडून उधार किंवा मागून मिळणाऱ्या मदतीवर जगत आहेत. पैसेही नाहीत, खायलाही नाही. तीन लाख रुपये ठेवले, आता मागून उदरनिर्वाह करतो.
पिशोर गावातील सुभद्राबाई राऊत यांनी आपल्या घराची विक्री करून १ लाख ८० हजार रुपये आदर्श समूहामध्ये ठेवले होते. मिळणाऱ्या व्याजातून त्यांचा एकट्याचा उदरनिर्वाह चालला होता. बँक बंद झाल्यामुळे घर गेले, पैसे गेले आणि आज त्या दुसऱ्यांनी दिलेल्या घरात राहतात. गावातील कार्यक्रमांमध्ये मिळणाऱ्या अन्नावर, तसेच शिळ्या अन्नावर त्यांना दिवस काढावे लागतात. घर विकून पैसे ठेवले आणि आता भीक मागून जगते. घरात दिव्यासाठी तेल आणायलाही पैसे नाहीत.
नारायण लोटे यांनी २५ वर्षे हॉटेलमध्ये काम करून साडेचार लाख रुपये जमवले. त्यांनी मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न आणि घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. हे सर्व पैसे आदर्श बँकेत ठेवले होते. काही काळ व्याज मिळाल्यानंतर बँक बंद पडली. आज त्यांचे स्वप्न भंगले असून, ते हॉटेलवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.