e-vehicle project file photo
छत्रपती संभाजीनगर

E-Vehicles : ई-वाहनांची संख्या वाढली, चार्जिंग सेंटरची मात्र वाणवा

इंधन दरवाढ, टॅक्स माफीमुळे कल वाढला

पुढारी वृत्तसेवा

The number of e-vehicles has increased, but the number of charging centers has decreased

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : इंधन दरवाढ तसेच ई-वाहनांसाठी रोड टॅक्स तसेच रोड सेफ्टी टॅक्समध्ये सूट असल्याने ई-वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असले तरी जिल्ह्यात चार्जिंग सेंटरची वाणवा भासत असल्याने वाहनधारकांना तूर्त तरी कसरत करतच ई-वाहन वापरावे लागत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, इंधन खर्चातील वाढ आणि केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन वापराला मिळणारे प्रोत्साहन यामुळे शहरात ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेईकल) वाहनांच्या बुकिंगमध्ये तब्बल ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाहन खरेदीदारांचा मोठा कल आता इलेक्ट्रिक चारचाकींकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी शोरूममध्ये दररोज केवळ १० ते १२ ईव्ही वाहनांची चौकशी किंवा बुकिंग होत असे. मात्र सध्या ही संख्या वाढून २० पेक्षा अधिक झाली आहे. विशेषतः पेट्रोल-डिझेलवरील खर्च कमी करण्यासाठी ग्राहक ईव्ही वाहनांना प्राधान्य देत आहेत.

चार्जिंग सेंटरची वाणवा

आजमितीला शहरात दुचाकी, तीन चाकी, चारचाकी व इतर वाहनांची संख्या ३५ हजार २७० वर गेली आहे. त्यात चारचाकी वाहनांची संख्या १ हजार ९०२ आहे, दुचाकीची संख्या ३० हजार १९९ इतकी आहे. सध्या दररोज २० ते ३० चारचाकीची बुकिंग होत असल्याने येत्या काही दिवसांत या वाहनांच्या संख्येत मोठी भर पडणार आहे. दरम्यान, ही वाहने चार्जिंग करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ ५७ जाचिंग सेंटरसह बॅटरी स्वपिंग सेंटर आहेत. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा मिळून १३८ सेंटर आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहन चार्जिंग करण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

टॅक्सच्या सुटीमुळे कल वाढला

केंद्र सरकारने ई-वाहनांचा वापर वाढवण्यासाठी रोड टॅक्स आणि रोड सेफ्टी टॅक्समधून सूट दिली आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांना मात्र हा कर भरावा लागतो. पेट्रोल वाहनांसाठी किमतीच्या ११ टक्के रोड टॅक्स तर दोन टक्के रोड सेफ्टी टॅक्स भरावा लागतो. उदाहरणार्थ ६ लाख रुपये किंमत असलेल्या पेट्रोलच्या चारचाकी गाडीला रोडटॅक्स सुमारे ७० ते ७५ हजार आणि रोड सेफ्टी टॅक्स १२ हजारांपर्यंत भरावा लागतो. ई-वाहन घेतल्यास वाहनधारकाला या टॅक्समधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळेही ई-वाहनांकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT