The NCP is in power in the Gangapur Municipal Council
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय विठ्ठलराव जाधव यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप सुधाकर पाटील यांचा २२५२ मतांनी पराभव केला.
संजय जाधव यांना ९७३९, तर प्रदीप पाटील यांना ७४८७ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.
नगरपरिषद सदस्य निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले असून, भाजपचे ७, शिवसेना (उबाठा) गटाचा १, तर १ अपक्ष नगर- सेवक विजयी झाला आहे. त्यामुळे गंगापूर नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.
या निवडणुकीत अभूतपूर्व मतदान झाले. नगराध्यक्षपदाच्या लढतीत एमआयएमचे शेख सोफियान शिरास यांना ९०६ मते, शिवसेनेच्या उमेदवाराला १३१० मते, तर काँग्रेसचे मोहसीन कबीर बागेस यांना १०३३ मते मिळाली.
खरी लढत मात्र राष्ट्रवादीचे संजय जाधव व भाजपचे प्रदीप पाटील यांच्यातच झाली. या निकालामुळे गंगापूरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, आगामी काळात नगरपरिषदेत पक्षाची निर्णायक भूमिका राहणार आहे.