The name Aurangabad is still displayed on the registry office; negligence of the officials
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर होऊन दोन वर्षे उलटली. सर्व शासकीय कार्यालयांकडून छत्रपती संभाजीनगर, असा उल्लेख होत आहे. परंतु रजिस्ट्री कार्यालयाला मात्र या नावाचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. रजिस्ट्री विभागाच्या बीड बायपास येथील दोन्ही कार्यालयांवर अजूनही औरंगाबादचेच फलक कायम आहेत. रजिस्ट्रीच्या अधिकाऱ्यांनी हे फलक बदलण्याची तसदी घेतलेली नाही.
नियमानुसार प्रत्येक मालमत्तेच्या खरेदी विक्रीची दस्त नोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सह दुय्यम निबंधकांची १३ कार्यालये आहेत. यातील तीन कार्यालये छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस आहेत. तर दोन कार्यालये शहरातील बीड बायपास रोडलगत आहेत.
उर्वरित आठ कार्यालये ही तालुक्यांच्या ठिकाणी आहेत. शासनाने दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले. त्यानंतर लगेचच सर्व शासकीय कार्यालयांनी आपापल्या कार्यालयांवरी पाट्या बदलल्या. तसेच कार्यालयीन कामकाजातही औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा वापर सुरू केला.
परंतु शहरातील बीड बायपास येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालय क्रमांक ३ आणि कार्यालय क्रमांक ६ ने अजूनही हा बदल केलेला नाही. या दोन्ही कार्यालयांवर अजूनही जुनेच औरंगाबाद नावाचे मोठेमोठे फलक झळकत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन वर्ष होऊनही या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हे फलक बदलण्याची तसदी घेतलेली नाही.
सह दुय्यम निबंधक कार्यालयात वर्ग २ चे अधिकारी कार्यालय प्रमुख असतात. मात्र, बीड बायपास येथील कार्यालयाचा पदभार सह दुय्यम निबंधक संवर्गातील अधिकार्यांऐवजी कारकुनांकडे सोपविण्यात आलेला आहे. या कार्यालयातील कारभाराची नेहमीच चर्चा होत आहे. त्यामागे वेगवेगळी कारणे असल्याचे सांगण्यात येते. कार्यालयावरील औरंगाबादच्या फलकाविषयी विचारणा करण्यासाठी प्रभारी सह दुय्यम निबंधक औदुंबर लाटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.