The Municipal Corporation will impose fines on those who waste water
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, महापालिकेने शहरातील विविध भागांत या योजनेतून पाणी वितरण सुरू केले आहे. शहरातील नो-नेटवर्कसह बहुतांश भागाला या योजनेतून पाणी दिले जाणार आहे.
मात्र, पाण्याच्या नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेकडून पुढील महिन्यापासून दंडाचा बडगा उगारला जाणार आहे. रस्त्यावर पाणी सोडणे, वाहने धुणे महागात पडणार असून एलनिनोच्या वाढत्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने ऑक्टोबरपासून पाण्याच्या वापरावर कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत सोमवारी (दि. २१) मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात सध्या तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठ्याची तयारी सुरू आहे. तसेच शहरात वितरणाच्या पाइपलाइन टाकण्याचे काम अद्याप सुरू असून जलकुंभांची कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहेत. सध्या नवीन योजनेतून शहराला १०० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे.
विविध भागांना पाणी देण्यासाठी १५००, २००० आणि १११८ मिलिमीटर व्यासाच्या तीन जलवाहिन्यांमधून वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तर १५०० मिलिमीटर जलवाहिनीतून सिडको हडको, जटवाडा, रामनगर, मुकुंदवाडी, नारेगाव, मिसारवाडी, आंबेडकरनगर आणि चिकलठाणा भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. यासह १११८ मिलिमीटर जलवाहिनीतून गारखेडा, जयविश्वभारती कॉलनी, क्रांतीचौक, मिलकॉर्नर आणि रेल्वेस्टेशन परिसराला पाणी मिळणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे.
यात सातारा-देवळाई, शिवाजीनगर, भारतनगर व अन्य भागांना २००० मिलिमीटर जलवाहिनीतून पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच या दोन्ही जलवाहिन्यांतून वितरण सुरू केले जाणार आहे. दरम्यान, महापालिकेकडून पाणी वितरणाचे सूक्ष्म नियोजन केले जात असले तरी यंदा एलनिनोचा प्रभाव वाढत असल्याने पुढील वर्षाच्या पावसाळ्यापर्यंत, म्हणजे जून २०२७ पर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.
जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच पावले उचलण्यास सुरूवात केली असून पाणीचोरी आणि गळती रोखण्यावर भर दिला जात आहे. यासह ऑक्टोबरपासून पाण्याची नासाडी होऊ नये यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.
मात्र रस्त्यावर पाणी सोडणे तसेच वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्या भागात अधिक दाबाने पाणी मिळते, तेथे विद्युत मोटारी बंद करण्याचाही विचार आहे. नळाद्वारे पाणी वाया जाऊ नये, यासाठी नळांना तोटी लावणे आवश्यक असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले. नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे एलनिनोचा प्रभाव वाढत असून पावसाळा कोरडा गेल्याने उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे.अमोल येडगे, महापालिका
पाइपलाइनची गळती रोखण्याचे आदेश शहरात विविध ठिकाणी फुटलेल्या पाइपलाइनमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंते आणि लाइनमन यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक भागातील पाइपलाइनची तपासणी केली जात आहे. नागरिकांनीही पाइपलाइन फुटल्याची माहिती महापालिकेला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यातून वाया जाणारे पाणी रोखण्यास मदत होणार आहे.
नळांना तोटी लावणे बंधनकारक
ऑक्टोबरपासून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. रस्त्यावर पाणी सोडणे, वाहन धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे यावर विशेष लक्ष राहणार असून नळांना तोटी लावणेही बंधनकारक करण्याची तयारी महानगरपालिकेने सुरू केली आहे.