Sambhajinagar News : मनपाच्या उचलेगिरीने नागरिक हैराण  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : मनपाच्या उचलेगिरीने नागरिक हैराण

ठराविक ठिकाणी कारवाई; नागरिक मित्र पथकाच्या डोळ्यावर झापड

पुढारी वृत्तसेवा

The municipal corporation, through the Citizens' Friends Team, is collecting heavy fines for vehicles parked along the road.

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतूक शिस्त राखण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलिसांनी आरोप होत असल्याने काही महिन्यांपासून चारचाकी व दुचाकी वाहने टोइंग करण्याचे बंद केले. मात्र महापालिकेने हम करे सो कायदा, अशी भूमिका घेत थेट नागरिक मित्र पथकाच्या माध्यमातून वाहन उचल मोहीम पुन्हा सुरू केली. उचलेगिरी करून रस्त्यालगत लावलेल्या वाहनांना ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे.

ठराविक एपीआय कॉर्नर ते प्रोझोन रस्ता, एमजीएम ते चिश्तिया चौक, सिडको रस्ता, सेंट्रल नाका ते सेव्हनहिल रस्ता या ठिकाणीच वाहने उचलण्याचा सपाटा लावला आहे. जालना रोडवर सर्रासपणे वाहने उभी असताना पथक फिरकतही नाही. ठराविक भागांपुरत्याच कारवाईने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलिस करतात. वाहने उचलताना आरोप होत असल्याने पोलिसांनी कारवाया बंद केल्या. मात्र त्यांचा विडा आता मनपाने उचलला आहे. अनेक आस्थापनांनी पार्किंगच्या जागाच गिळंकृत केल्याने नागरिकांना रस्त्यालगत वाहने लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. बाजारात खरेदीसाठी किंवा रुग्णालयात गेल्यानंतर उभी केलेली वाहने नागरिक मित्र पथक उचलतात. लोकांच्या अडचणींचा मनपा गैरफायदा घेत मनमानी पद्धतीने वाहने टोइंग करून दंडाच्या नावाखाली खुलेआम वसुली करत आहे. पार्किंग उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असणाऱ्या आस्थापनांना भिडण्याची मनपाची हिम्मत नाही. त्यांच्याशी साटेलोटे करून सोयीस्करपणे नागरिकांना टार्गेट करून मनपा स्वतःची तिजोरी भरण्याचे काम करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

» मनपा पोसतेय पांढरा हत्ती

महापालिकेने १५० जणांचे नागरिक मित्र पथक कंत्राटी पद्धतीने घेतले आहे. मात्र हे पथक ठराविक एपीआय ते प्रोझोन रस्ता, एमजीएम ते चिश्तिया चौक, सिडको रस्ता, सेंट्रल नाका ते सेव्हनहिल रस्ता या ठिकाणी दिवसभर कारवाई करण्यात मश्गुल असते. त्यामुळे या भागापुरत्या कारवायासाठी या पथकाचे मानधन देणे तरी परवडते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

» पथकाकडून नागरिकांना दादागिरीची भाषा

स्वतःचे वाहन उचलून नेल्यानंतर विचारणा करण्यासाठी गेलेल्या वाहनधारकांना पथकातील कर्मचारी थेट दादागिरीची भाषा करतात. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची भाषा इतकी उद्धट असते की, थेट जा आयुक्तांकडे तक्रार करा, असा उलटा सूर लावला जातो. प्रशासनाचे नाव घेऊन सामान्य जनतेला गप्प बसवण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.

» तिजोरी भरण्यासाठी कारवाई?

ज्या भागांमध्ये मनपा वसुली करू शकते, तेथेच रेटून कारवाई केली जाते. बाकीचे रस्ते आणि चौक यांना जणू अभय दिल्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे हा शिस्त लावण्याचा कार्यक्रम आहे की महापालिकेची तिजोरी भरण्याचा? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

▶ दोनच महिन्यांत दोन हजार कारवाया

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेने ठराव घेऊन अशी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जाहिर प्रगटन देऊन हरकती मागवल्या मात्र कोणीही आक्षेप न घेतल्याने मे महिन्यांत कारवाईला सुरवात झाली. दोनच महिन्यांत १५३३ मोटारसायकलवर ५ लाख ६६ हजार रुपयांचा दंड तर चारचाकी ४८९ वाहने उचलून ९ लाख ७८ हजारांचा दंड वाहनधारकांकडून वसूल केला.

» नागरिकांनी घेतली धास्ती

कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या बाहनावर दंड आकारला जातो किंवा ते टोइंग केले जाते. त्यामुळे आपले वाहन सुरक्षित आहे की नाही याचीच चिंता नागरिकांना अधिक सतावते. धास्तावलेल्या नागरिकांचा संयम सुटतो आहे.

आयुक्त साहेब, या भागाकडे आहे का लक्ष ?

औरंगपुरा, पैठणगेट, निराला बाजार, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, क्रांती चौक, अदालत रोड, मिलकॉर्नर, हडको, टीव्हीसेंटर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, बीड बायपास, दर्गा चौक, शिवाजीनगर, गजानन मंदिर रोड, पुंडलिकनगर, रोशनगेट, कटकटगेट, चंपा चौक, शहागंज यासह शहरातील इतर प्रमुख रस्त्यांवरही वाहने सर्रासपणे उभी असतात. मनपा आयुक्तांनी वाहने उचलण्यासाठी नेमलेले पथक या भागात फिरकतही नाही.

» चहा-नाश्ताच्या ठिकाणी कानाडोळा

शहरातील काही चहा-नाश्ता केंद्रे, हॉटेल्स किंवा मंगल कार्यालयांसमोर वाहनांच्या रांगा दिसत असल्या तरी तेथे कारवाई होत नाही. त्यामुळे काही व्यावसायिक संस्थांना पथकाचे अभय असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT