The municipal corporation has taken concrete steps to prevent infant mortality
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील बालमृत्यू रोखण्यासाठी महापालिकेकडून ठोस पाऊल उचलण्यात आले असून, यासंदर्भात मंगळवारी (दि.३०) महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अन्वेषण बैठकीत ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. यात गरोदर मातांची नोंदणी १२ आठवड्यांच्या आत होणे आवश्यक असून, आशा स्वयंसेविकांमार्फत त्यांना आरोग्य केंद्रात बोलावून वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेकडून बालमृत्यू प्रतिबंधासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत असून, याच अनुषंगाने मंगळवारी बालमृत्यू अन्-वेषण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नऊ बालमृत्यूंचे सखोल अन्वेषण करण्यात आले. त्यातून गरोदर मातांची वेळेत नोंदणी, नियमित तपासणी आणि प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी या बाबींवर विशेष भर देण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले.
तसेच अतिजोखमीच्या गरोदर मातांची (हाय रिस्क प्रेग्नन्सी) स्वतंत्र नोंद ठेवून त्यांना समुपदेशन देणे व दोन बाळंतपणांमध्ये किमान तीन वर्षांचे अंतर राखण्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, गरोदर मातांची नोंदणी १२ आठवड्यांच्या आत होणे, आशा स्वयंसेविकांमार्फत त्यांना आरोग्य केंद्रात बोलावून वजन, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या बैठकीला शासकीय व खासगी रुग्णालयांतील बालरोग तज्ज्ञ, आरोग्य अधिकारी, नर्सिंग स्टाफ, आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग्य नियोजन, वेळेत उपचार व प्रभावी जनजागृती केल्यास बालमृत्यू व मातामृत्यू निश्चितपणे रोखता येतील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
प्रत्येक महिन्याला क्वालिटी व्हिजिट
प्रत्येक महिन्याला क्वालिटी व्हिजिट अंतर्गत तपासणी न झाल्यास संबंधित आरोग्य अधिकारी व इन्चार्ज सिस्टर यांनी तात्काळ दखल घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. तर प्रसूतीपूर्व तयारी अंतर्गत डिलिव्हरीचे ठिकाण निश्चित करणे, स्तन तपासणी, नवजात बाळाची काळजी, योग्य स्तनपान, वाळाला गुंडाळण्याचे प्रशिक्षण व हायपोथर्मिया टाळण्याबाबत मार्गदर्शन देण्यावरही भर देण्यात आला. तसेच माता व बाळांमधील धोक्याची लक्षणे गरोदरपणातच समजावून सांगण्याचे आवाहन करण्यात आले.