Road Safety : बालचित्रकारांच्या कुंचल्यातून उमटला रस्ते सुरक्षेचा संदेश file photo
छत्रपती संभाजीनगर

Road Safety : बालचित्रकारांच्या कुंचल्यातून उमटला रस्ते सुरक्षेचा संदेश

पिशोर पोलिसांतर्फे वाहतूक जनजागृती चित्रकला स्पर्धा; ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.

पुढारी वृत्तसेवा

The message of road safety emerged from the work of child artists

पिशोर, पुढारी वृत्तसेवा : रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पिशोर पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने मंगळवारी (दि. एक) वाहतूक जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक शाखेच्या समन्वयाने पोलिस ठाणे हद्दीतील विविध शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कुंचल्यातून रस्ते सुरक्षेचे प्रभावी संदेश साकारले. स्पर्धेसाठी वाहतूक नियम पाळूया, अपघात टाळूया आणि 'हेल्मेट आणि सीट बेल्ट हे जीवनाचे सुरक्षा कवच' हे विषय देण्यात आले होते. या विषयांना अनुसरून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत महात्मा साकारलेल्या चित्रांमधून रस्त्यावर वाहन चालविताना नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, याचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.

ज्योतिबा फुले हायस्कूल, पिशोर, समता माध्यमिक विद्यालय, पिशोर, मथुरामाता माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, चिंचोली लिंबाजी आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, नाचनवेल येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व पोलिस उपनिरीक्षक शाम गवळी यांची उपस्थिती होती. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी म्हणाले, वाहतुकीचे नियम हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून स्वतःचा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच निर्माण व्हावी, या उद्देशाने या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने संयोजकांनी समाधान व्यक्त केले.

२३ उत्कृष्ट चित्रांची पुढील फेरीसाठी निवड

स्पर्धेनंतर प्रत्येक शाळास्तरावर उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात येणार असून, त्यापैकी २३ उत्कृष्ट चित्रे पुढील टप्प्यासाठी पाठविण्यात येणार आहेत. ही चित्रे ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाहतूक शाखेत सादर करण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उत्कृष्ट चित्रांचे पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्ट कॉरिडॉरमध्ये एक महिना प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT