The massive crowd at the wedding hall caused a three-hour traffic jam on the Harmul-Sawangi road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गाला जोडणारा आणि शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हर्मूल-सावंगी रस्ता रविवारी (दि.८) सायंकाळी वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला होता. रस्त्यावरील मंगल कार्यालयांमध्ये झालेल्या तुफान गर्दीमुळे आणि रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या बेशिस्त पार्किंगमुळे सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.
वाहतूक पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे तब्बल तीन तास हजारो वाहनध-रिकांना मनस्ताप सहन करावा लागला. हसूल पोलिस ठाणे ते सावंगी टोल नाका यादरम्यान ही वाहतूक कोंडी झाली होती.
अधिक माहितीनुसार, सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने हर्मूल-सावंगी रस्त्यावरील मंगल कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळी मुहूर्ताच्या वेळी वऱ्हाडींच्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. समृद्धी महामार्गाकडे जाणारी आणि शहरात येणारी जड वाहने, एसटी बसेस आणि रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकून पडल्या होत्या.
रस्त्यावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार याची कल्पना असूनही, वाहतूक शाखेने या मार्गावर पुरेसा बंदोबस्त तैनात केला नव्हता. जे काही कर्मचारी उपस्थित होते, त्यांना या प्रचंड कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांचे अस्तित्व केवळ दंड वसुलीसाठीच आहे का? असा संतप्त सवाल वाहनधारक विचारत होते.
रस्त्यालगत वाहने पार्किंग केल्याने कोंडी
प्रत्यक्षदर्शीन दिलेल्या माहितीनुसार, हसूल सावंगी या मुख्य रस्त्यावर मोठ्याप्रमाणात मंगल कार्यालये आहेत. लग्नसोहळ्यात वाजणारे डीजे आणि लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या गाड्यांमुळे पूर्णतः वाहतूक जाम होत आहे. वाहनधारकांना नेहमीच या समस्येचा सामना करावा लागत आहे.
ठोस उपाययोजना केल्या जातील शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने लवकरच याबाबत ठोस उपाययोजना केल्या जातील. यासंदर्भात पोलिस आयुक्तांसोबत लवकरच बैठक घेऊ.- डॉ. भागवत कराड, खासदार, राज्यसभा