the lure of excess profits in the stock market; Environmental consultant cheated of Rs. 15 lakhs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारात गुंतवणुकीवर आणि आयपीओमध्ये सवलतीच्या दरात शेअर्स देऊन मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, एका पर्यावरण सल्लागाराला व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जाळ्यात ओढत सायबर भामट्यांनी १५ लाख ५० हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दीपक संघई (६०, रा. दिशानगरी, बीड बायपास) यांच्या तक्रारीनुसार, ते पर्यावरण सल्लागार म्हणून काम करतात आणि शेअर मार्केटमध्येही गुंतवणूक करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुक मेसेंजरवर रेड्डी नावाच्या एका व्यक्तीने संपर्क साधला.
या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो संघई यांच्या ओळखीच्या मित्रासारखा (संदीपान रेड्डी) असल्याने त्यांचा त्यावर विश्वास बसला. ३१ जुलै २०२६ रोजी भामट्यांनी त्यांना ब्राईट फ्युचर २०२ आणि नंतर व्हीआयपी १६९ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपमध्ये शेअर बाजारात मोठ्या नफ्याबाबत सतत मेसेजेस टाकले जात असत. सान्वी वाधवा नावाने स्वतःला अॅडमिन सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांना एका वेबसाईटवर नोंदणी करण्यास भाग पाडले. व्हिडिओ कॉल आणि आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशनचा बनाव करून त्यांना तिथे खाते उघडण्यास लावले.
धमक्या आल्यावर लक्षात आली फसवणूक
संघई यांनी आणखी पैसे भरण्यास नकार दिल्यावर भामट्यांनी त्यांना फोन आणि मेसेज करून आर्थिक दंड आणि कायदेशीर कारवाईची धमकी देण्यास सुरुवात केली. संशय आल्याने संघई यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना केवळ १ लाख ५० हजार रुपयेच परत मिळाले. अशा प्रकारे त्यांची एकूण १५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली. त्यांनी सुरुवातीला नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शैलेश देशमुख हे करत आहेत.
१७ लाख उकळले अन् ४२ लाखांची केली मागणी
सुरुवातीला फाउंडेशनल स्टॉक्स आणि ओव्हर द काउंटर शेअर्समध्ये गुंतवणूक करून नफा झाल्याचे ऑनलाईन भासवले गेले. त्यानंतर आयपीओमध्ये सवलतीच्या दरात शेअर्स देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांत टप्प्याटप्प्याने एकूण १७ लाख रुपये जमा करून घेण्यात आले.
ऑनलाईन खात्यात शेअर्स अलॉटचा बनाव
संघई यांना त्यांच्या ऑनलाईन खात्यात ९० लाख ४५ हजार रुपयांचे शेअर्स अलॉट झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. हे शेअर्स मिळवण्यासाठी भामट्यांनी त्यांच्याकडे आणखी ४२ लाख ८२ हजार रुपयांची मागणी केली. एवढी मोठी रक्कम नसल्याचे सांगितल्यावर भामट्यांनी ५ टक्के व्याजदराने कर्ज घेण्याची ऑफर दिली.