The land records office is caught in the grip of corruption
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील भूमिअभिलेख कार्यालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गुरुवारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याच्या कथित मआर्थिकलीलेफ्मुळे हे कार्यालय चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय देण्याची जबाबदारी असलेले हे कार्यालय आज भ्रष्टाचार, दलालगिरी आणि बेकायदेशीर वसुलीचे केंद्र बनल्याचे गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत काझी नावाच्या कर्मचाऱ्यावर पदाचा गैरवापर केल्याचे अत्यंत धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. नागरिकांची कामे जाणीवपूर्वक रखडवणे, लाच न दिल्यास फाईली दाबून ठेवणे, दलालांच्या माध्यमातून आर्थिक लूट करणे तसेच सरकारी फाईली घरी नेण्यासारखे गंभीर प्रकार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भाजपचे जिल्हा महासचिव हाफिज काकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष जुबेर चाऊस यांनी भूमिअभिलेख उपअधीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जमीन मोजणी, नकाशा दुरुस्ती, नामांतरण व वारस नोंदणी यांसारख्या अत्यंत संवेदनशील प्रकरणांमध्ये काझी यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र याच अधिकारांचा गैरवापर करून अर्जदारांच्या संचिका जाणूनबुजून अडवून ठेवल्या जातात.
वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे सरकत नाही, तर पैसे देणाऱ्यांची कामे मात्र झटपट उरकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी चौकशीदरम्यान काझी हे कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयात गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला. यावर उपअधीक्षक विजय संधानशिव यांनी काझी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून, तीन दिवसांत खुलासा मागवून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावर तक्रार पाठवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कार्यालयात येणाऱ्या जवळपास प्रत्येक अर्जदारामागे काझी यांचे एजंट कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे दलाल थेट नागरिकांच्या घरी जाऊन किंवा फोनवरून पैशांची मागणी करतात. मदाम द्या, काम कराफया उघड धोरणामुळे भूमिअभिलेख कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
सरकारी फाईली थेट घरी
या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे काझी यांनी सरकारी फाईली कार्यालयाबाहेर नेऊन आपल्या घरी ठेवल्याचा आहे. हा प्रकार केवळ नियमभंग नसून, कागदपत्रांमध्ये छेडछाड व नोंदींमध्ये हेराफेरी होण्याचा मोठा धोका निर्माण करणारा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक महत्त्वाच्या फाईली आजही काझी यांच्या घरीच असल्याचा दावा करण्यात आला असून, तातडीने छापेमारी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भ्रष्टाचाराने आता डिजिटल स्वरूप धारण केल्याचेही उघड झाले आहे. दुर्गानगर परिसरातील एका प्रकरणात फोन-पेच्या माध्यमातून लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला असून, या डिजिटल व्यवहारांचे पुरावे निवेदनासोबत सादर करण्यात आले आहेत.