The Kolhapuri Bandhare on the Girija river are overflowing
वडोद बाजार, पुढारी वृत्तसेवा: फुलंब्री तालुक्यातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळख असलेली गिरिजा नदी मागील सहा महिन्यांपासून सातत्याने प्रवाहित असून, नदीवरील सर्व कोल्हापुरी बंधारे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा लाभहोत आहे.
यावर्षी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे मे महिन्यातच गिरिजा नदीला पूर आला होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून, डिसेंबर अखेरपर्यंतही गिरिजा नदी खळखळून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात गिरिजा नदीवरील पाश्री, कविटखेडा, भालगाव, वडोद बाजार, वडोद खुर्द व शेवता आदी ठिकाणच्या सर्व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे दरवाजे टाकण्यात आले होते.
त्यामुळे पाथ्री शिव-ारापासून ते बोरगावपर्यंत नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून, बंधाऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. या साठवलेल्या पाण्याचा थेट फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. गहू, मका, बाजरी आदी रब्बी पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
कपाशीचे पीक काढल्यानंतर अनेक शेतकरी आता मका व बाजरीसारखी पिके घेताना दिसून येत आहेत. याशिवाय, नदीपात्रालगत असलेल्या शेतांमधील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून गिरिजा नदीत सातत्याने पाणी वाहत असल्याने भूजल पातळी उंचावली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिलासा मिळणार आहे.
परिसरातील विहिरींची पाणी पातळी वाढली
गिरिजा नदीचे पात्र गेल्या ६ महिन्यांपासून सातत्याने वाहत असल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. तसेच या बंधाऱ्यांमुळे विहिरींची पाणी पातळी वाढली आहे. उन्हाळ्यातही या भागातील विहिरींना पाणी टिकून राहणार असल्याने यावर्षी या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे.