The Information Commission has settled 24,000 cases
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दोन वर्षांत तब्बल २४ हजार द्वितीय अपिले निकाली काढली आहेत. सन २०२४ मध्ये खंडपीठाने १४ हजार आणि २०२५ मध्ये १० हजार ७८३ द्वितीय अपिलांचा निपटारा केला आहे.
माहिती अधिकाराचा अर्ज केल्यानंतरही अनेक वेळा शासकीय कार्यालयांकडून माहिती पुरविली जात नाही. काही वेळा अर्धवट माहिती दिली जाते. अशा प्रकरणात आयोगाकडे अपिले दाखल होतात. त्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी माहिती आयोगाची खंडपीठे आहेत. नुकत्याच संपलेल्या २०२५ या वर्षात आयोगाच्या तक्रार निवारणात १० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
तर २०२४ अखेरीस प्रलंबित असलेल्या १६५ तक्रारींची संख्या डिसेंबर २०२५ अखेर ८५ वर आली असून, त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये ५१ टक्के घट झाली आहे. द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेतही मोठी घट झाली आहे. २०२४ अखेरीस ८ हजार ६९९ द्वितीय अपिले प्रलंबित होती. ती संख्या डिसेंबर २०२५ अखेर ३ हजार ९४६ इतकी झाली असून, प्रलंबित अपिलांच्या प्रमाणात सुमारे ५५ टक्के घट झाल्याचे स्पष्ट होते.
नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत न्याय मिळावा, हाच आयोगाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. शिवाय माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यात येईल.- प्रकाश इंदलकर, राज्य माहिती आयुक्त