Sambhajinagar : संभाजीनगरात डीजेमुक्त मिरवणुकीचा आदर्श  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : संभाजीनगरात डीजेमुक्त मिरवणुकीचा आदर्श

बॅण्डच्या सुमधुर चालीवर बाप्पाला निरोप, तब्बल १५ तासांहून अधिक वेळ चालला शिस्तबद्ध जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

The ideal of DJ-free Ganpati procession in Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांसह गुलालाची उधळण करत पारंपरिक वाद्याच्या सुमधुर चालीवर शनिवारी (दि.६) लाडक्या गणरायाला जडअंतःकरणाने निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे यंदा डीजेमुक्त मिरवणूक काढून छत्रपती संभाजीनगर वासियांनी नवा आदर्श ठेवला. अधून मधून पावसाची रिपरिप अंगावर घेत गणेशभक्तांच्या अलोट गर्दीनेही या डीजेमुक्त मिरवणुकीचा आनंद लुटला. तब्बल १५ तासांहून अधिक वेळ मिरवणूक सुरू होती.

प्रतिवर्ष परंपरेप्रमाणे शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीची सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते आरतीनंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, आमदार संजय कणेकर, माजी आमदार अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रक्रांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, संस्थान ट्रस्टचे सचिव प्रफुल मालानी, गणेश महासंघ उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आणि पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थित शहरातील विलोभनीय जल्लोशपर्वाचा श्रीगणेशा झाला.

प्रशासनाकडून यंदा डीजेमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील गणेश मंडळांनी यास साद दिली. मुख्य विसर्जन मिरवणूक पूर्णपणे डीजेमुक्त निघाली. बॅण्ड पथकाच्या तालावर सर्वांनीच ठेका धरला. तरुणाईच्या सहभागाने मिरवणुकीत रंगत आणली, विविध भागातील सार्वजनिक गणेश मंडळ या मिरवणूकीत सहभाग होत होती तसा भक्तांचा जल्लोषही वाढत गेला. पारंपारिक वाद्यासह शिस्तबद्ध, तालबद्ध आणि सांधिक ढोलपथकांचा नजराणा जरा खासच होता. लेझीम पथकाच्या सादरीकरणानेही गणेश भक्तांना खिळून ठेवले. बहुतेक मंडळांनी खास बॅण्ड पथकांना आमंत्रित केल्याने मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी सुमधुर वाद्य ऐकण्याची व त्यावर ठेका धरण्याची पर्वणी गणेश भक्तांना मिळाली. रात्री अडीचवाजेपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती.

भर पावसातही गणेशभक्तांचा उत्साह

सकाळपासून अधून मधून बरसणारा पाऊस आणि संध्याकाळनंतर पावसाचे रिपरिप सुरु असतानाही गणेश मंडळासह गणेश भक्तांचा उत्साह कायम होता. गुलालाची उधळण करत पारंपारिक वाद्यसह बैंड बाजाच्या लयबद्ध चालीवर ताल धरत गणेश मंडळाच्या सदस्य भाविक भक्तही तल्लीन झालेले दिसत होते. बाळगोपाळांसह युवती महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

या मंडळाचे गणपती ठरले आकर्षण

छावणी मोहल्ला येथील बाल कन्हैय्या गणेश मंडळाचा नवसाचा राजा, मुलमची बाजार येथील शिवसेना गणेश मंडळाची साबुदाण्याची १४ फुट उंच गणेश मूर्ती आणि शाहबाजार, भवानीनगरचा राजा मंडळाचे पारंपारिक वाद्याच्या तालावर थिरकत मिरवणूक काढली. सुखकर्ता गणेश मंडळाने श्रींच्या मूर्तीमागे लावलेली डिजीटल स्क्रीनने लक्ष वेधले होते.

विविध पक्षांचे स्वागत व्यासपीठ, प्रसादाचे वाटप

विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी शहर पोलिसांसह विविध राजकीय पक्ष, संघटनांनी विसर्जन मिरवणूक मार्गावर स्वागत व्यासपीठ उभारले होते. तसेच विसर्जन मार्गावर जागोजागी पाणी, प्रसाद वाटप सुरू होते.

प्रशासनाचा चोख बंदोबस्त विसर्जन मिरवणुकीनिमित्त पोलिस प्रशासनाकडून सर्व मार्गावर बंदोबस्त तैनात होता. सिटी चौकात जास्त गर्दी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने सर्व मंडळांना सादरीकरणासाठी ठराविक वेळ आखून दिला होता.

बॅण्ड पथकांना आले अच्छे दिन

डीजे बंदीमुळे बॅण्डपथकांना अच्छे दिन आले. शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी चाळीसगाव, उज्जैनहून बॅण्ड पथक बोलावले होते. त्यांच्या सुमधुर चालीवर थिरकत भक्तांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने पथकांतील वादकही भारावून गेले. श्री संभाजी क्रीडा मंडळ, नवयुग मंडळ, भवानीनगरचा राजा, वीर बलराम मंडळ, साचता गणेश मंडळ. संगम प्रतिष्ठान, नवयुग प्रतिष्ठान, विघ्नहर्ता गणेश मंडळ यासह अन्य गणेश मंडळाच्या ढोल पथकाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. अंगुरीबाग येथील सुखकर्ता गणेश, हितापदेश, श्री अहिरवंश गणेश मंडळ, श्री जबरे हनुमान मंडळ, श्री सिद्धी विनायक तसेच श्री बाल गजानन गणेश मंडळ, छत्रपती क्रिडा मंडळ यासह अन्य गणेश मंडळ या विसर्जन मिरवणूकीत सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT