The house of a couple who went to Dubai was broken into.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुबईला मुलाला भेटायला गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचे घर फोडून चोरट्याने ८५ हजारांची रोकड, चार ग्रॅम सोने आणि १६० ग्रॅम चांदीची नाणे, मोबाईल असा सव्वालाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी (दि. ४) दुपारी तीनच्या सुमारास एन-१२, डी सेक्टर येथे उघडकीस आली.
फिर्यादी अखिल मजीद यार खान (३६, रा. जुबलीपार्क) यांची आत्या सीमा आणि त्यांचे पती मिन्हाज अहेमद खान अश्फाक अहेमद खान (६९, रा. प्लॉट क्र ५, डी सेक्टर एन-१२) हे ४ ऑक्टोबरला दुबई येथे मुलाला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेले. जाताना त्यांनी अंगणात साफसफाई करण्यासाठी गेटची चावी रेखा पाटोळे यांच्याकडे दिली होती.
त्या दररोज गेट उघडून साफसफाई करायच्या. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास रेखा साफसफाईसाठी आल्या तेव्हा त्यांना गेटचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पहिले तर घरचेही कुलूप, कडी-कोंडा तुटलेला दिसला. त्यांनी शेजरच्या शेख शफिक यांना आवाज देऊन बोलाविले. त्यांनी अखिल याना कळविले.
घरात जाऊन पाहणी केली. मिन्हाज यांना व्हिडिओ कॉल करून माहिती दिली. घरातून ८५ हजार रोख, प्रत्येकी २ ग्रॅमची चेन आणि कानातील बाळी, १६० ग्रॅम चांदीचे शिक्के, एक जुना मोबाईल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत