The historic Barava will be revived!
बबन गायकवाड
वाळूज : जिल्ह्यातील ऐतिहासिक बारवांचा ठेवा जतन करण्यासाठी राज्यशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्राचीन बारवांचे संवर्धन केले तर भावी पिढीला त्याची माहिती मिळेल. व ऐतिहासिक ठेवा जतन होईल यासाठी राज्यशासनानतर्फे बारव संवर्धनासाठी एक समिती गठीत केली आहे. उशिरा का होईना सरकाने घेतलेला हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया वाळूजसह परिसरात ऐकायला मिळत आहेत.
सातवाहन काळापासून अशा बारवांची निर्मिती सुरू झाल्याची आख्यायिका आहे. आजच्या घडीला राज्यात २० हजार ऐतिहासिक बारवा आहेत. त्यापैकी मराठवाड्यात ३०० तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ७२ ऐतिहासिक बारवा आहेत. मात्र त्या काळाच्या ओघात तसेच स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोप पावत चालल्या आहेत.
हा ऐतिहासिक ठेवा भावी पिढीला मार्गदर्शक ठरावा त्या दृष्टिकोनातून शासनाने आता अशा बारवांचे पुनरुज्जीवन, संवर्धन व जतन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती याविषयी विविध उपाययोजना करण्याचे काम करणार आहे. या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्यविभाग सचिव आदी या समितीचे विद्यमान अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तसेच त्या भागातील २० अशासकीय सदस्य म्हणून वारव अभ्यासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचे वाळूज भागात स्वागतच होत असून या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
गंगापूरचे आ. प्रशांत बंब यांनी बारव जीर्णोध्दारसाठी २ कोटी ७२ लाखाचा निधी आणला आहे. त्यात परिसरातील ४ तर तालुक्यातील मिळून ११ बारवांचा समावेश आहे. काळाच्या ओघात जिल्ह्यात काही बारवा सोडल्या तर अनेक ठिकाणच्या बारव अखेरची घटका मोजतांना दिसून येतात. या बारवांमध्ये केरकचरा, अतिक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. मात्र याकडे संबंधित तसेच स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष दिसून येते.
वाळूज येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या बारवावर होणारे अतिक्रमण काढून संबंधितांवर कारवाई करावी अशा आशयाचे एक निवेदन १३ मार्च २०१४ रोजी ग्रामस्थांनी ८१ जणांच्या सहीने गंगापूरच्या तत्कालिन तहसिलदारांसा पंचायत समिती, वाळूज पोलिस ठाणे व स्थानिक ग्रामपंचायतीला दिले होते. त्यावर तत्कालिन तहसिलदारांनी १४ मार्च २०१४ रोजी वाळूज ग्रामपंचायतीला कारवाई करण्याचा आदेशदिला होता. मात्र या आदेशानंतरही ग्रामपंचायतीन कोणतीच कारवाई केलेली नाही. ते तशीच अजूनही ठप्पच आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर मुख्यमहामार्गालगतच १०० फुटांवर वाळूज येथील जि.प. प्रशालेच्या शेज-ारी, सावखेडा रोडवरील शेंदुरवादा, सावखेडा, मांडवा, गुरुधानोरा, दहेगाव, महालक्ष्मीखेडा, बोरुडी, भगतवाडी, तुर्काबाद खराडी, अंबेल-ोहळ या ठिकाणी ऐतिहासिक बारवाचा ठेवा आहे. मात्र तो संबंधित व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अनेक बारवा आज शेवटच्या घटका मोजत आहेत. ही शोकांतिकाच आहे. दोन वर्षांपूर्वी दहेगाव बंगला येथील ग्रामस्थांनी बारवाचा जीर्णोध्दार केलेल्याचे आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
बारव ही ही आपल्या वारसाची अमूल्य अशी संपत्ती असूनही सध्या काही बारवा अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत. बारव फक्त पाण्याची सोय नाही, तर इतिहासाचे ठसे जपणारी सांस्कृतिक संपत्ती आहे. तिचे जतन झाले तर भविष्यातील पिढ्यांसाठी हे एक अमूल्य देणे ठरेल.- राहुल ढोले, शेतकरी कृती समिती
वाळूज भागात अधिकाधिक बारवा आहेत. त्या जतन करून त्याचे सौंदर्य राखण्याची गरज आहे. त्या भावी पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरतील. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करावी.ज्ञानेश्वर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
संबंधित विभागासह शासननियुक्त समितीने अतिक्रमण झाले आहे. याची सविस्तर माहिती दिल्यास ते तत्काळ निष्कासित करण्यात येईल.नवनाथ वगवाड, तहसिलदार गंगापूर