The hammer will fall on encroachment on the land of the Irrigation Department
पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवरील करण्यात आलेले अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात बुलडोझर फिरविण्याची तयारी पूर्ण झाली असून, कुठल्याही वेळी जायकवाडी उत्तर, जायकवाडी दक्षिण, नाथसागर धरण परिसरातील ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची जायकवाडी उत्तर, जायकवाडी दक्षिण येथील शासकीय निवासस्थानामधील व नाथसागर धरण परिसरात गेल्या काही वर्षीपासून नागरिकांनी अतिक्रमण करून सदरील निवासस्थान व भूखंडावर आपला कब्जा केला. काही व्यक्तींनी तर ही जागा कुठलीही परवानगी न घेता भाडे तत्वावर दिली.
ही बाब पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आल्यामुळे सदरील जागे-वरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटीस बजावण्यात आलेली असतानाही संबंधित अतिक्रमणधारकांनी कुठलाही प्रतिसाद पाटबंधारे विभागाला न दिल्यामुळे शेवटी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संबंधित पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पाटबंधारे विभागाच्या भूखंडावरील व शासकीय निवासस्थानामधील अतिक्रमण तात्काळ जमीनदोस्त करण्याचा आदेश दिल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, शाखा अभियंता रितेश भोजने यांनी संबंधित अधिक्रमणधारकांना अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याची अंतिम नोटीस दिलेली आहे. वेळेच्या आत अतिक्रमण न काढल्यास पोलिस बंदोबस्तात बुलडोझर फिरविण्याची तयारी या विभागांनी पूर्ण केली आहे
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैठण पोलिस ठाणे व एमआयडीसी पोलिस ठाण्यात अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिस बंदोबस्त मिळाण्यासाठी पत्र दिले असून, सदरील पत्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितली आहे.
बंदोबस्तसाठी पोलिसांना पत्र
गेल्या अनेक वर्षांपासून पैठण तालुक्यातील जायकवाडी उत्तर, दक्षिण जायकवाडी शासकीय निवासस्थान व नाथसागर धरण परिसरातील शासकीय भूखंडावरील अतिक्रमण तात्काळ पोलिस बंदोबस्तात काढण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याला पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यासाठी पत्र दिले आहे.